कफ सिरपची जाहिरात 'तुम्हारी सुलू' ला महागात? एफडीए बजावणार नोटीस

'तुम्हारी सुलू' सिनेमाच्या प्रमोशनसाठी विद्या बालनने नुकतीच एका कफ सिरपची जाहिरात केली. पण ही जाहिरात विद्या बालनसह जाहिरात निर्माते, कफ सिरप उत्पादक कंपनी आणि तुम्हारी सुलू चित्रपटाच्या निर्मात्यांना चांगलीच महागात पडणार आहे. कारण या जाहिरातीत 'सुलू' अर्थात विद्या बालनला 'सेल्फ मेडीकेशन' अर्थात डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय खोकल्याचं औषध घेताना दाखवण्यात आलं आहे.

काय सांगतो कायदा?

औषध आणि सौंदर्य प्रसाधन कायद्यानुसार 'सेल्फ मेडीकेशन' चुकीचं आणि घातक मानलं जातं. हाच धागा पकडत आता अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए)ने विद्या बालनसह इतर संबंधितांना नोटीस बजावण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एफडीए आयुक्त पल्लवी दराडे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.

घातक 'कोडीन'

बऱ्याचशा कफ सिरपमध्ये 'कोडीन' हा घटक असतो. त्यामुळे अशा सिरपचा वापर नशेसाठीही केला जातो. त्यामुळे कोडीनयुक्त कप सिरपचं उत्पादन आणि त्यांची विक्री यासंदर्भातील नियम अत्यंत कडक करण्यात आले. तर काही सिरपच्या उत्पादन-विक्रीवर बंदीही घालण्यात आली आहे.

'सेल्फ मेडीकेशन' धोक्याचं

कफ सिरप असो वा साधी डोकेदुखीची टॅबलेट स्वत: हून घेणं घातक असल्याने सेल्फ मेडीकेशन न करण्याचा सल्ला डाॅक्टरांकडून दिला जातो. असं असताना विद्या बालनने 'तुम्हारी सुलू'च्या प्रमोशनसाठी टोरेक्स कफ सिरपची जाहिरात केली असून या जाहिरातीत ती 'सेल्फ मेडीकेशन' करताना दिसत आहे.

आक्षेप कशासाठी?

या जाहिरातीतील सेल्फ मेडीकेशनवर आक्षेप घेत गेल्या आठवड्यात काही डाॅक्टरांनी 'एफडीए'कडे तक्रार केली आहे. तर ही जाहिरात त्वरीत मागे घेत अशी जाहिरात करणाऱ्या सर्वांवर कायदेशीर कारवाईची मागणी केल्याची माहिती दराडे यांनी दिली. या तक्रारीनुसार तपास केला असता जाहिरातीत 'सेल्फ मेडीकेशन' केल्याचं स्पष्ट झालं आहे. डाॅक्टरांच्या सल्ल्यानेच हे औषध घ्यावं, असा वैधानिक सल्ला जाहिरातीत कुठेही देण्यात आलेला नसल्याचंही समोर आलं.

दरम्यान, अशा जाहिरातींविरोधात कारवाई करण्याची तरतूद कायद्यात नाही. तरीही 'सेल्फ मेडीकेशन'चा मुद्दा पकडत जनहिताच्यादृष्टीने विद्या बालन, जाहिरातीचे निर्माते, कफ सिरप उत्पादक कंपनी आणि तुम्हारी सुलू चित्रपटाच्या निर्मात्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात येणार आहे. तर ही जाहिरात त्वरीत मागे घेण्याचे आदेशही या नोटीशीअंतर्गत देण्यात येणार असल्याचंही दराडे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता विद्या बालन या नोटीशीला नेमकी काय उत्तर देते आणि जाहिरात मागे घेते का? याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या