झी गौरव सोहळ्याची सर्वाधिक नामांकनं कुणाला?

मुंबई - झी गौरव पुरस्कार सोहळ्याचा नामांकन सोहळा द वेस्टीन मुंबई गार्डन, गोरेगाव येथे झाला. यावर्षी आपल्या कामगिरीने राज्यातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या 'सैराट' चित्रपटाने सर्वाधिक अकरा नामांकने मिळवली आहेत. सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर यांच्या ‘कासव’ने आठ आणि ‘हाफ तिकीट’ आणि ‘रंगा पतंगा’ने सात विभागात नामांकने मिळवत स्पर्धेत चुरस निर्माण केली आहे.

व्यावसायिक नाटकांमध्ये‘अमर फोटो स्टुडिओ’ने बारा विभागात नामांकने मिळवत अव्वल स्थान मिळवले आहे. तर, ‘मग्न तळ्याकाठी’ नाटकाने नऊ विभागात तथा ‘कोडमंत्र’ आणि ‘तीन पायांची शर्यत’ नाटकाने प्रत्येकी सहा विभागात नामांकने मिळवत स्पर्धेत रंगत निर्माण केली आहे.

प्रायोगिक नाटकांमध्ये ‘हे राम’ दहा नामांकने, ‘एमएच 12 जे 16’ आणि ‘हंडाभर चांदण्या’ नाटकाने प्रत्येकी सात नामांकने मिळवली आहेत. अजय-अतुलच्या संगीताची जादू आणि आर्ची-परश्याच्या प्रेम कथेने देशभरातील प्रेक्षकांची मने जिंकली. सैराटची ही जादू झी गौरवच्या नामांकनातही बघायला मिळाली.

सैराटने उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनेता आणि अभिनेत्री, उत्कृष्ट संगीतासहित अनेक महत्त्वाच्या विभागांत नामांकने मिळवली. आशयघन चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या दिग्दर्शकद्वयींच्या ‘कासव’नेही परीक्षकांचे लक्ष वेधत आठ नामांकने मिळवली आहेत.

शेतकऱ्याची आणि त्याच्या बैलाच्या नात्याची गोष्ट सांगणाऱ्या संवेदनशील ‘रंगा पतंगा’नेही सात नामांकने मिळवली आहेत. पुष्कर श्रोत्री या लोकप्रिय अभिनेत्याच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘उबंटु’चित्रपटाने उत्कृष्ट चित्रपटासह इतरही महत्त्वाच्या विभागात नामांकने मिळवली आहेत.

सुनील बर्वे यांच्या सुबकची निर्मिती असलेल्या आणि यावर्षी प्रेक्षकांची वाहवा मिळवणाऱ्या ‘अमर फोटो स्टुडिओ’ने परीक्षकांचीही मने जिंकत बारा विभागांत नामांकने मिळवली आहेत. महेश एलकुंचवार यांच्या लेखणीने आणि चंद्रकांत कुलकर्णी यांच्या दिग्दर्शनाने सजलेल्या ‘मग्न तळ्याकाठी’ नाटकानेही नऊ विभागांत नामांकने मिळवत स्पर्धेत रंगत आणली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या