हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेचा घनकचरा विभाग कामाला लागला आहे. रस्त्यांवर उडणारी धूळ रोखण्यासाठी वर्षभर रस्ते धुण्यात येणार आहेत. पावसाळा वगळून उरलेल्या सुमारे दीडशे दिवसांसाठी रस्ते धुण्याकरीता 125 पाण्याचे टँकर भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत. गल्लोगल्लीतील रस्ते धुण्यासाठी यामध्ये लहान टँकरही घेण्यात येणार आहेत.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून हवेचा स्तर बिघडत चालला असून वायू प्रदूषणाबाबत मुंबई महापालिकेने यापूर्वीच तयार केलेली नियमावली पुन्हा एकदा लागू करण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांपासून हिवाळा आला की मुंबईतील प्रदूषण वाढते. वाहनांच्या वर्दळीतून व विकासकामांमधून मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर धूळ उडत असते. ही धूळ हटवण्यासाठी रस्ते पाण्याने धुण्याचा पर्याय मुंबई महापालिकेने आणला होता. त्याकरीता टँकरही भाड्याने घेतले होते. या टँकरचे कंत्राट संपले असून आता नव्याने 125 टँकरची सेवा भाड्याने घेतली जाणार आहे.
रस्ते धुण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याच्या टँकरची संख्या यंदा वाढवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने घेतला आहे. त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या असून 125 पाण्याचे टँकर भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत.
हे टँकर पावसाळा कालावधी वगळता दीडशे दिवसाच्या कालावधीसाठी मुंबईतील रस्ते धुण्यासाठी वापरले जाणार आहेत. मोठया पाण्याच्या टँकरने गल्लोगल्लीतील रस्ते धुणे अवघड होत असल्याने यंदा लहान टँकरही घेण्यात येणार आहेत.
गेल्या दोन – तीन वर्षांपासून दरवर्षी हिवाळ्याची चाहुल लागली की मुंबईतील हवेचा स्तर बिघडत जातो. दोन वर्षांपूर्वी मुंबईतील हवेचा स्तर दिल्लीच्या हवेपेक्षाही वाईट झाला होता. त्यावेळी पालिकेने प्रदूषणावरील उपाययोजनांसाठी एक कृती आराखडा तयार केला होता.
हिवाळा आला की त्यापाठोपाठ वायू प्रदूषण येते आणि त्यापाठोपाठ पालिकेचा कृती आराखडाही बाहेर येतो. बांधकामांना नोटीसा द्या, बांधकाम बंदी घाला, रस्ते पाण्याने धुवा, शेकोट्यांना बंदी घाला अशा उपाययोजना केल्या जातात.
यंदाही महापालिकेने प्रदूषण रोखण्यासाठी दीडशे दिवसांच्या कालावधीसाठी भाडेतत्वावर पाण्याचे टँकर घेण्याचा निर्णय घेतला आहे. याआधीचे कंत्राटदाराचे कंत्राट संपुष्टात आले. त्यामुळे नव्याने निविदा काढून पाण्याच्या टँकरची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
यामध्ये पाच हजार लिटर आणि नऊ हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टँकरबरोबरच दोन हजार लिटर क्षमतेचेही पाण्याचे टँकर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचा