मुंबई वगळता राज्यातील अनेक भागांत पुन्हा थंडी

मुंबईसह राज्यभरातच नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला बऱ्यापैकी गारठा पडला होता. नागरिकांना थंडीची चाहुल लागली होती. परंतू, दिवाळीत थंडी गायब झाली होती. राज्याच्या अनेक भागातील विशेषत: मुंबईच्या तामपनात वाढ झाली. कमाल तापमान ३५ अंशाच्या आसपास नोंदविण्यात आल्यानं मुंबईकरांना उकाड्याच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिवाळीत मुंबईतच्या तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. दरम्यान, उत्तर कोकणात, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात येत्या ४८ तासांत तापमानात घट होईल. कमाल तापमान ३० अंशाखाली तर किमान तापमान १४ ते १८ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येईल, अशी शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे. परिणामी थंडीचा कडाका पुन्हा एकदा वाढणार आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला मुंबईसह राज्यात सर्वत्र थंड वातावरण निर्माण झालं होतं. विशेषत: मुंबईचं किमान तापमान १९ अंशावर दाखल झालं होतं. तसंच राज्यात मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात थंडीनं चांगला जोर पकडला होता. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पडलेला गारठा दुसऱ्या आठवड्यातही काही दिवस कायम होता. मात्र दिवाळी दाखल होते तोच मुंबईमधली थंडी गायब झाली आणि किमान तापमानाचा पारा थेट २३ अंशावर दाखल झाला.

दिवाळी सुरु झाल्यापासून संपेपर्यंत मुंबईच्या किमान तापमानाचा पारा चढाच होता. आणि आता तर कमाल तापमान देखील वाढत असून, वाढत्या तापमानाचा मुंबईकरांना फटका बसत असून, ऊकाड्यात किंचित वाढ झाल्याचं चित्र आहे. यंदा पाऊस जास्त झाल्यानं कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणखी गारठणार असून, मुंबईचं तापमान डिसेंबरपर्यंत १५ अंशाच्या खाली घसरणार आहे.

२० डिसेंबरपासून थंडी आणखी वाढणार असून तापमान ५ अंशापेक्षा खाली घसरण्याची शक्यता आहे. मुंबईबरोबरच पुण्याचा पारा ७ अंशाखाली तर नागपूरचा पारा ५ अंशाखाली तर नाशिक जिल्ह्यामधील निफाडचे तापमान शून्य अंश सेल्सिअस गाठू शकेल. विदर्भ, मराठवाडा, उत्तर व पश्चिम महाराष्ट्र आणि त्यानंतर कोकण किनारपट्टी असा तापमान घसरण्याचा दर असेल.

पुढील बातमी
इतर बातम्या