ओखी वादळाचा इफेक्ट, मुंबईत पावसाचा जोर वाढला

ओखी चक्री वादळामुळे मंगळवारी मुंबईत सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरही झाला. सकाळपासून मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. मुंबईच्या रस्त्यावर ठिकठिकाणी वाहतूक कोंडीही झाली आहे. दुसरीकडे वादळामुळे महापालिकेच्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. दक्षिण मुंबईत पावसाचा जोर वाढला असून मुंबईसह किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

समुद्रकिनारी न जाण्याचे पोलिसांचे आवाहन

मुंबईसह राज्यभरात ओखी वादळाचा परिणाम सोमवारी संध्याकाळपासूनच जाणवू लागला. सोमवारी संध्याकाळपासून मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली. याचबरोबर मंगळवारी सकाळपासूनच मुंबई आणि उपनगरात पुन्हा पावसाला सुरुवात झाली.

मुंबईसह कोकणात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मंगळवारी दुपारी 12.43 वाजता 4.35 मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. दररोज 10 किमी वेगाने वाहणारे वारे मंगळवारी आणि बुधवारी 50 ते 60 किमी वेगाने वाहणार आहेत. या वाऱ्याच्या वेगामुळे जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.


हेही वाचा -

'ओखी'ची भिती: मुंबईसह पालघर, रायगड, ठाणे, सिंधुदुर्गमधील शाळा बंद, काॅलेज सुरू

पुढील बातमी
इतर बातम्या