ओखी वादळाच्या परिणामाने मुंबईत ४ आणि ५ डिसेंबर रोजी धुवांधार पाऊस पडला. अचानक पडलेल्या या पावसामुळं नेमका हा ऋतू कोणता? हिवाळा की पावसाळा? असा प्रश्न मुंबईकरांना पडला. पण हा ऋतू हिवाळा किंवा पावसाळा नसून 'हिव'साळा असल्याचं बहुतांश मुंबईकरांचं म्हणणं आहे. त्यातच मुंबईत सोमवारी आणि मंगळवारी पडलेल्या जोरदार पावसाने ५० वर्षांचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. मंगळवारी सकाळी ८.३० ते बुधवारी सकाळी ८.३० पर्यंत सांताक्रूझमध्ये ५३.८ मीमी आणि कुलाब्यात ८२.२ मीमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
तर, मंगळवारी रात्रभर पडलेल्या पावसामुळे सांताक्रूझमध्ये ३.५ आणि कुलाब्यात २.२ इतक्या पावसाची नोंद झाली आहे. पण बुधवारी सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. तरी बुधवारी आणि गुरुवारी पावसाच्या हलक्या सरी बरसतील, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. दरम्यान उत्तर कोकणच्या किनारपट्टीवर आणि डहाणूत सोमवारी ते मंगळवारपर्यंत १०४ मीमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
या पावसामुळे मंगळवारी मुंबईचं तापमान सामान्यापेक्षा १० अंश सेल्सियसने खाली आलं होतं. मुंबईच्या तापमानानं पहिल्यांदाच अशाप्रकारे ५० वर्षांतला निच्चांक गाठला आहे.