२० वर्षानंतर मुंबईकरांना हुडहुडी; स्वेटर खरेदीस गर्दी

उत्तर आणि वायव्येकडून गार वाऱ्यामुळे महाराष्ट्रासह मुंबईत थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत तापमानाचा पारा चांगलाच घसरला असून हवामान खात्याकडून सोमवारी सांताक्रुझ परिसरात  १५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. जवळपास २० वर्षानंतर मुंबईत अशाप्रकारे कडाक्याची थंडी पडली असून अनेक मुंबईकर स्वेटर, शाल, कानटोप्या खरेदी करण्यास गर्दी करताना दिसत आहेत. 

आठवडाभरापासून थंडी

गेल्या आठवडाभरापासून मुंबईकरांना थंडीची चाहूल लागली असून फोर्ट, दादर, परळ, वांद्रे, मालाड, घाटकोपर या परिसरात स्वेटर, कानटोपी, मफलर, हातमोजे अशा उबदार कपडय़ांचे स्टॉल लागलेले दिसत आहेत. हुडहुडी भरलेल्या थंडीपासून बचावासाठी अनेक नियमित ग्राहकांसोबत काही तरूण मंडळी बदलत्या ट्रेंडनुसार स्वेटर खरेदी करताना दिसत आहेत.

स्वेटरचे भाव वाढले

गेल्या कित्येक वर्षांपासून स्वेटर खरेदीकडे पाठ फिरवली होती. परंतु यंदा कडाक्याची थंडी पडल्यानं ग्राहकांचा स्वेटर खरेदीसाठी ओढा वाढला आहे. पंजाब, दिल्ली, काश्मीर यांसारख्या विविध ठिकाणाहून यंदा स्वेटरची आयात करण्यात येत आहे. तसेच यंदा स्वेटरचे भावही १० टक्क्यांनं वाढले असले तरी उत्साहानं ग्राहक स्वेटर खरेदी करत आहेत.

किंमत ३०० ते ५०० 

यंदा स्वेटरमध्ये स्वेटशर्ट हुडी, झिपर, कार्डिगन, लोकरीचं स्वेटर, यांसारखे विविध प्रकार बाजारात आले असून यांची किंमत ३०० ते ५०० पर्यंत आहे. त्याशिवाय बाजारात मंकी कॅप, लोकरीची कानटोपी, पॉप-पॉम हॅट, रिब-नाईट हॅट, यांसारखे विविध कानटोपीचे प्रकार बाजारात उपलब्ध झाले आहेत. या कानटोपीची किंमत १५० रूपये आहेत. विशेष म्हणजे लहान मुलांसाठीही यंदा ट्रेंडी स्वेटर बाजारात आले असून यात विविध रंगसंगतीही उपलब्ध आहेत. 


पुढील बातमी
इतर बातम्या