एप्रिल महिन्यात येणार उष्णतेची तीव्र लाट

गेल्या काही आठवड्यात मुंबईतील तापमानात चढ-उतार होत आहे. मात्र, आता एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. १० एप्रिलपासून तापमानाचा पारा वाढणार आहे.

एप्रिल महिन्यात मुंबईकरांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागू शकतो. याकाळात तापमानाचा पारा ४० अंशापर्यंत पोहचू शकतो, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

गुजरात आणि राजस्थानमध्ये मागच्या आठवड्यात झालेल्या पावसाचा फटका मुंबईच्या हवामानावर झाला होता. गुजरात आणि राजस्थानमधून आलेल्या थंड हवेमुळं मुंबईतील वातावरणात कधी गारवा तर कधी उकाडा वाढायचा.

देशातील पश्चिमी भागात पावसाची तीव्रतादेखील कमी झाली आहे. तेथील तापमानात वाढ झाल्यामुळं मुंबईकरांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागू शकतो.

पश्चिमी भागात चक्रीवादळासारखे क्षेत्र निर्माण झाल्यामुळं गुजरात आणि राजस्थानमध्ये तापमानात घट झाली होती. चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्यामुळं पश्चिमी भागातील उष्ण वारे वाहू लागले आहेत. परिणामी मुंबईतील तापमानात वाढ होऊ लागली आहे. २ एप्रिल रोजी मुंबईचे तापमान ३१ अंशापर्यंत पोहोचले होते.

'या' आठवड्यात दिलासा

या आठवड्यात मुंबईतील तापमानात वाढ होण्याची शक्यता कमी आहे. मात्र, एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात उकाड्यात प्रचंड वाढ होऊ शकते. यंदा मार्च महिन्यातच महाराष्ट्रातील काही भागात तापमानाचा पारा ३९ अंशापर्यंत पोहोचला होता. वातावरण सतत होणाऱ्या बदलांमुळं यावर्षी तापमानात वाढ होऊ शकते.

सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले

हवामानात सतत होणाऱ्या बदलांमुळं मौसमी आजारही बळावले आहेत. या काळात व्हायरसचा फैलाव जास्त वाढतो. अशातच सर्दी, खोकला, तापयासारख्या रुग्णांची संख्या वाढते. मुंबईत सर्दी, खोकला आणि ताप यासारख्या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे.


हेही वाचा

मुंबईतल्या 2 एअर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशनची नाव बदलली

पुढील बातमी
इतर बातम्या