मुंबई, मुंबई उपनगरसह कोकणामध्ये पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
मुंबईसह नवी मुंबई, ठाणे आणि वसई विरारमध्ये पावसाचा जोर वाढला होता. पुढील चार ते पाच दिवसांमध्ये संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय राहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
संपूर्ण कोकण, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून मुंबई महापालिकेला अलर्टवर राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. सर्व ठिकाणी 64 मिमी ते 200 मिमीपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आज बोईसर ,डहाणू तालुक्यात काही भागात दमदार पाऊस,तर जव्हार मोखाडा भागात तुरळक पाऊस कोसळत आहे. दरम्यान, वसई विरार आणि मीरा भाईंदर शहरात बुधवारी रात्रभर पावसाच्या रिमझिम सरी बरसत होत्या. तर अधून मधून जोरदार पावसाला ही सुरूवात होत आहे.
आज दुपारनंतर वसई विरारमध्ये पावसाने जोर धरलेला पाहायला मिळाला आहे. वसई, नालासोपारा आणि विरार मधील सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. नालासोपारा पुर्वेकडील आचोले रोड हा दुपारनंतर पाण्याखाली गेला होता.
पुढील तीन ते चार दिवसांमध्ये दक्षिण कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं येत्या 3 ते 4 दिवसांत कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्या परिस्थितीत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.