आरे आंदोलन : २९ आंदोलकांवरील गुन्हे मागे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे संदर्भात आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. आरेतील वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या अनेक पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही माहिती दिली. 

४ ऑक्टोबरला अंधाराचा फायदा घेत अनेक झाडांची कत्तल करण्यात आली. ४ ऑक्‍टोबरच्या रात्री स्थानिकांनी आणि पर्यावरणप्रेमींनी वृक्षतोडीचा विरोध करण्यासाठी आपला मोर्चा आरे कारशेडच्या जागी वळवला. त्यावेळी आंदोलन करणाऱ्या काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. ५ ऑक्टोबरला देखील विरोध करणार्‍या काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. जवळपास २९ आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. आता या 29 आंदोलकांवर गुन्हे उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर मागे घेण्यात येतील. 

अनेक नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर उद्धव ठाकरे हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. पदभार घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ‘आरे’मधील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देत असल्याची घोषणा केली. आता तर सर्व पर्यावरणप्रेमींवरील गुन्हे मागे घेत असल्याचं त्यांनी घोषित केलं. 


पुढील बातमी
इतर बातम्या