यावर्षी मान्सून उशीरा येण्याची शक्यता : IMD

कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या कालावधीत मुंबईकरांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. एकिकडे कोरोनाव्हायरसमुळे लोकं घरात अडकून आहेत. तर दुसरीकडे उकाडा वाढला आहे. त्यामुळे घरातून साधी बाहेर हवा खायला देखील बाहेर पडणं कठिण झालं आहे. अशा परिस्थितीत भारतीय हवामान खात्यानं (आयएमडी) दिलेल्या माहितीनं सगळ्यांच्याच चिंतेत भर पडली आहे. आयएमडीनुसार यंदा मान्सून उशीरा येण्याची शक्यता आहे.

सध्या शहराचा पारा चांगलाच वाढला आहे. यासह उष्णता आणि आर्द्रता दोन्हीही वाढत आहेत. त्यामुळे मुंबईकर अस्वस्थ होत आहेत. त्यात सर्वच घरात लॉकडाऊन झाले आहेत. पावसाचे आगमनच या उकाड्यातून मुक्त करेल, अशी आशा सर्वांनाच आहे. म्हणून सर्वच पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

भारतीय हवामानशास्त्र विभागानं (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार मुंबईत यंदा मान्सूनचे आगमन होण्यास थोडासा विलंब होऊ शकतो. मुंबईत मान्सून साधारणत: १० जूनपर्यंत पोहचतो. परंतु यावर्षी मान्सूनचं आगमन होण्यास एक दिवसाचा विलंब होऊ शकतो. यावर्षी एक दिवस पुढे म्हणजेच ११ जून रोजी पाऊस पडेल.

फक्त एवढंच नाही तर मान्सून एक आठवडा उशीरानं जाईल, असंही आयएमडीनं सांगितलं आहे. म्हणजेच यावर्षी २९ सप्टेंबरला परत जाण्याऐवजी ८ ऑक्टोबरपर्यंत मान्सून असेल.

आयएमडीचे उपमहासंचालक (पश्चिमी प्रदेश) एस. होसाळीकर म्हणाले, “१९६१ ते २०१९ पर्यंतच्या आकडेवारी आम्ही मान्सूनच्या आगमनाचा अंदाज लावतो. तर मान्सून जाण्याचा निश्चित कालावधी आम्ही १९७१ ते २०१९ या आकडेवारीच्या आधारे ठरवतो.”

राज्यातील इतर शहरांविषयी बोलताना पुणे इथं मान्सून सुरू होण्यासाठी एक दिवस उशीर होऊ शकतो. पुण्यात मान्सून ९ जूनऐवजी १० जूनला दाखल होऊ शकेल. तर ६ ऑक्टोबरऐवजी ११ ऑक्टोबरला निरोप घेऊ शकतो. तर नागपूरमध्ये पावसाचं आगमन दोन दिवस उशीरा होऊ शकतं. तर ६ ऑक्टोबरला निरोप घेऊ शकतो.


पुढील बातमी
इतर बातम्या