पारा वाढला, मुंबईत उष्णतेच्या लाटेचा इशारा

मुंबईमध्ये उन्हाचा पारा वाढत आहे. गुरुवारपर्यंत मुंबईच्या तापमानाचा पारा आणखी चढण्याची शक्यता आहे. हे तापमान 38 अंशांपर्यंत पोहोचू शकते, असे प्रादेशिक हवामान विभागाने म्हटले आहे. मुंबईचे कमाल तापमान मंगळवारी अवघ्या 24 तासांमध्ये 2.2 अंशांनी वाढले. कोकणामध्ये दमट आणि उष्ण हवामानामुळे अधिक त्रास जाणवू शकतो, असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे.

मुंबईत मंगळवारी कुलाबा येथे 32.2 तर, सांताक्रूझ येथे 34.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सोमवारपेक्षा कुलाबा येथे 1.4 तर सांताक्रूझ येथे 2.2 अंशांनी अधिक कमाल तापमान नोंदवले गेले. मुंबईच्या किमान तापमानामध्येही वाढ नोंदवली गेली असून कुलाबा येथे 23 तर सांताक्रूझ येथे 22.5 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले.

कोकण विभागात येत्या दोन तीन दिवसांत काही प्रमाणात दमट हवा असेल, अशी शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. उन्हाळ्याच्या काळात समुद्रावरून येणारे वारे उशिराने वाहतात, त्यामुळे हवेमध्ये दीर्घकाळ उष्णता राहते.

20 मार्च ते 22 मार्च या काळात कोकण विभागात यामुळे कमाल तापमानामध्ये वाढ होईल अशी शक्यता आहे. राज्यात काही भागांमध्ये कमाल तापमान 3 ते 4 अंशांनी वाढू शकेल. काही स्वतंत्र हवामान अभ्यासकांच्या मते ठाणे, अंबरनाथ, पनवेल अशा काही भागांमध्ये तापमान ४० अंशांच्या वर जाणवण्याची शक्यता आहे.


मुंबईतील 20 फ्लायओव्हर्सचे सुशोभिकर पालिका करणार

पुढील बातमी
इतर बातम्या