मुंबईत २६ मार्चपर्यंत असणार ढगाळ वातावरण

मुंबईसह आसपासच्या परिसरात मंगळवार सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. राज्याच्या काही भागांत पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. मात्र ऐन उन्हाळ्याच्या सुरूवातीला मुंबईसह कोकणपट्ट्यावर पावसाचे सावट असल्याचं समजतं. शिवाय, हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, २६ मार्चपर्यंत ढगाळ वातावरण कायम असणार आहे. त्यामुळं उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळाचे संकेत आहेत. सध्या तेथे कमी दाबाचे तीव्र क्षेत्र आहे. परिणामी, महाराष्ट्रात काही भागांत पावसाळी वातावरण निर्माण झाले असले, तरी या चक्रीवादळाचा राज्यावर फारसा परिणाम होणार नाही.

सांताक्रूझ येथे ३१.७ अंश सेल्सिअस आणि कुलाबा येथे ३२ अंश सेल्सिअस असे कमाल तापमान नोंदवले गेले. दोन्ही ठिकाणी सरासरीच्या तुलनेत अनुक्रमे एका अंशाची घट आणि एका अंशाची वाढ झाली होती. सांताक्रूझ येथे २३.६ अंश सेल्सिअस आणि कुलाबा येथे २४.८ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. दोन्ही ठिकाणी सरासरीच्या तुलनेत दोन अंशांची वाढ झाली होती.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे मंगळवारी आणि बुधवारीही पावसाची शक्यता आहे. इतर ठिकाणी गुरूवापर्यंत हवा कोरडी राहील. विदर्भात अनेक ठिकाणी अद्यापही कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. मराठवाड्यात परभणी, नांदेडमध्येही ४० अंश कमाल तापमान असल्याने उन्हाचा चटका कायम आहे.

बंगालच्या उपसागरात आणि अंदमानच्या समुद्रात दोन दिवसांपासून कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचे रूपांतर सोमवारी चक्रीवादळात होणार आहे. दोन दिवस चक्रीवादळाची स्थिती राहणार असून, ते अंदमान, निकोबारच्या दिशेने जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही दोन दिवसांपासून पावसाळी वातावरण तयार झाले आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊसही  झाला. अनेक भागात अंशत: ढगाळ वातावरण आहे. मात्र, चक्रीवादळाचा राज्यावर फारसा परिणाम होणार नाही.

पालघर, ठाणे, रायगड आणि मुंबईच्या काही भागांत रविवारी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे मेघगर्जनेसह हलका पाऊस झाला. दिवसभर हवामान ढगाळ असल्याने वातावरणात काहीसा गारवा होता.

पुढील बातमी
इतर बातम्या