मुंबईकरांनो घाबरू नका... ओखीचा प्रभाव हळूहळू कमी!

दक्षिण भारतात हाहाकार माजवणारं ओखी वादळ अरबी समुद्रात घोंगावत असून त्याचा मुंबईलगतच्या समुद्र किनाऱ्यावर धोका निर्माण होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त होत होती. पण मुंबईकरांनो, आता घाबरण्याचे कारण नाही. कारण मुंबईला आता ओखीचा धोका नाही!

प्रभाव कमी, पण मच्छिमारांना इशारा

ओखीचा प्रभाव हळूहळू कमी होत असून, येत्या दोन दिवसांत हे वादळ शमेल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. मात्र, हे वादळ अजूनही मुंबईच्या किनाऱ्यापासून ८८० किमी दूर असल्याने मुंबई-कोकणातील मच्छिमारांना सर्तकतेचा इशारा देत मंगळवारपर्यंत मासेमारी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तामिळनाडूमध्ये हाहाकार

दक्षिणेतील केरळ आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर ओखी वादळाने हाहाकार माजवला असून या वादळाने आत्तापर्यंत तेथील २२ जणांचा बळी घेतला आहे.

कसं सुरू झालं 'ओखी'?

अरबी समुद्रात लक्षद्वीपजवळ निर्माण झालेल्या ओखी वादळामुळे मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर शनिवारी जोराचे वारे वाहत होते. मुंबईत नोव्हेंबरमध्ये ताशी ८ ते १० किलोमीटर प्रती तास वेगाने वाहणारे वारे शनिवारी मात्र १४ किलोमीटर प्रतितास वेगाने वाहत होते. त्यामुळे मुंबईसह गोव्यापर्यंतच्या बंदरांना हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देत मासेमारी बंद ठेवण्यात आली आहे.

मुंबई किनारपट्टीवर सर्तकतेचा इशारा दिल्याने मुंबईकरांच्या मनात नाही म्हटले तरी ओखी वादळाची थोडीफार का होईना, पण भिती होतीच. पण आता घाबरण्याचे काहीही कारण नसल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

तामिळनाडूच्या ६८ बोटी सिंधुदुर्ग किनारपट्टीवर!

दरम्यान, ओखी वादळामुळे समुद्रात भरकटलेल्या केरळ आणि तामिळनाडूतील ६८ बोटी सिंधुदुर्ग किनारपट्टीवर पोहोचल्या आहेत. या बोटीतील ९५२ मच्छिमार सुखरूप असून हवामान पूर्वपदावर येईपर्यंत या मच्छिमारांची योग्य ती काळजी घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांसह महाराष्ट्र सागरी महामंडळाला दिले आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या