पुढच्या ४८ तासांत मुंबईत मान्सून पूर्व पावसाची शक्यता, स्कायमेटचा अंदाज

मान्सून श्रीलंकेत येऊन दाखल झाल्याने मुंबईतही पुढच्या ४८ तासांत मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता खासगी हवामान संस्था स्कायमेटने व्यक्त केली आहे. श्रीलंकेत पाऊस पडल्यानंतर पुढच्या आठवडाभरात भारतात पाऊस दाखल होतो. 

दरवर्षी श्रीलंकेत २५ मे पर्यंत मान्सून दाखल होतो. परंतु यंदा मान्सून दाखल होण्यास ८ ते १० दिवसांचा उशीर झाला आहे. भारतात सर्वात पहिल्यांदा केरळमध्ये मान्सून दाखल होईल. त्यानंतर मान्सून हळूहळू पुढं सरकेल. त्यानुसार मुंबईतही मान्सून पूर्व पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. 

तसं बघायला गेल्यास मे महिन्यातच मुंबईत मान्सून पूर्व पावसाला सुरूवात होते. परंतु हवामान तज्ज्ञांच्या मते यावर्षी अरबी समुद्रात मे महिन्यात मान्सून पूर्व सरींना अनुकूल वातावरण तयार न झाल्याने मुंबईत अद्याप पाऊस झाला नाही.

मात्र आता अरबी समुद्रात ढगांनी गर्दी करण्यास सुरूवात केली असून त्यामुळे मुंबईचं वातावरणही ढगाळ आणि दमट झालं आहे. त्यामुळे लवकरच मुंबईत मान्सून पूर्व पावसाला सुरूवात होईल.


हेही वाचा-

मुंबईसह राज्यभरात ढगाळ वातावरण, राज्यात काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता

यंदाचा पावसाळा मुंबईकरांसाठी दिलासा देणारा ठरेल - महापौर विश्वनाथ महाडेश्वर


पुढील बातमी
इतर बातम्या