राणीच्या बागेत घुमणार सिंहाची डरकाळी

भायखळा येथील राणीच्या बागेत आता लवकरच सिंहाची डरकाळी कानी पडणार आहे. राणी बागेत गुजरात व इंदूर प्राणीसंग्रहालयातून सिंह, कोल्हा, अस्वल यांच्या प्रत्येकी दोन जोड्या येणार आहेत.

राणी बागेच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. आधुनिकीकरणाच्या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण झाली आहेत. दुसऱ्या टप्प्यात प्राण्यांकरिता आवासस्थाने बांधण्यात येत आहेत. या कामांपैकी वाघ, बिबटय़ा, तरस, देशी अस्वल, पक्षी पिंजरा-१, कोल्हा, बाराशिंगा, चितळ, सांबर, आशियाई सिंह आदी प्राण्यांकरिता पिंजरे बांधून पूर्ण झाले आहेत. काही प्राणी आणण्यातही आले आहेत. आता लवकरच सिंहाची जोडीही येणार आहे.

सिंहांच्या जोडीच्या बदल्यात गुजरात आणि इंदूरच्या प्राणी संग्रहालयांना झेब्राची जोडी द्यावी लागणार आहे. यासाठी झेब्राच्या जोड्या परदेशातून आणून गुजरात आणि इंदूरच्या प्राणी संग्रहालयात पोहोचाव्या लागणार आहेत. यासाठी पालिका ८४ लाख ६४ हजार रुपये खर्च करणार आहे.

सिंहांच्या निवासाकरिता नव्याने बांधण्यात आलेल्या प्रदर्शनीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तर प्रदर्शनीच्या बाहेरील बाजूस सिंहांना राहण्याकरिता गीर येथील `मलधारी’ आदिवासी प्रजातीच्या घरांप्रमाणे रचना करण्यात आली आहे. 

गीर येथील आशियायी सिंहाची प्रजाती प्रख्यात असल्याने त्याच धर्तीवर या ठिकाणी आवासस्थाने तयार करण्यात आली आहेत. यामध्ये सिंहाच्या नैसर्गिक गरजा भागवण्याकरिता गुहा, सिंहांना लपण्याकरिता गुहा, छोटी झुडपे, सावलीच्या जागा, मोठी झाडे, जलाशयासह सिंहांना बसण्याकरिता मोठे दगड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.


हेही वाचा -

मुंबईच्या वेशीवर दोन महिन्यांनंतर फास्टॅग बंधनकारक

फायर बाईकसाठी पालिकेची निविदा, निमुळत्या जागेसाठी सोईस्कर


पुढील बातमी
इतर बातम्या