Ganesh festival 2020 गणेशोत्सवासाठी दहिसर बोरीवलीत मूर्ती दान योजना

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

कोरोनामुळे यंदा आर्थिक गणित बिघडल्यानं तसंच, देणग्या व वर्गणी मिळण्याची शक्यता कमी असल्यानं गणेशोत्सव साजरा करण्यावरून अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये चिंतेच वातावरण निर्माण झालं आहे. मुंबईत असे अनेक मंडळं आहेत. त्यामुळं या मंडळांचा गणेशोत्सव यंदा साधेपणानं का होईना साजरा व्हावा यासाठी दहिसर व बोरीवलीतील शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्या भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना २ फूटी पेण येथील प्रसिद्ध पर्यावरण पूरक शाडूची मूर्ती व पूजेचे साहित्य देणगी स्वरूपात देण्याचा संकल्प केला आहे.

महापालिकेच्या विधी समिती अध्यक्ष व शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक ७ च्या नगरसेविका शीतल म्हात्रे व प्रभाग क्रमांक ११ च्या शिवसेनेच्या नगरसेविका रिद्धी खुरसंगे व माजी नगरसेवक भास्कर खुरसंगे यांनी त्यांच्या भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना गणेश मूर्ती व पूजेचे साहित्य यांची येत्या २० जुलैपर्यंत त्यांच्या आवडीची मूर्ती नोंदणी करण्याचं आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून मंडळांना केलं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सवावर संकट आलं आहे. यंदाचा गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. तसंच, गणपतीच्या मूर्तींबाबतही नियम-अटी घालण्यात आली आहे. गणेश मूर्ती ४ फूटांच्या आत ठेवा असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना केले. 

पुढील बातमी
इतर बातम्या