वडाळ्याच्या राम मंदिरात भाविकांची गर्दी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

वडाळा - राम नवमीचा उत्सव हा अयोध्यापासून ते अगदी मुंबईमध्येसुद्धा मोठ्या आनंदात साजरा होताना पाहायला मिळतो. त्यापैकीच एक म्हणजे महाराष्ट्रातील अयोध्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या वडाळा येथील राम मंदिरात राम नवमीचा उत्सव मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. मागील आठवड्यापासून राम नवमी उत्सवाची रेलचेल सुरू होती. राम नवमीच्या दिवशी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली.

वडाळा येथील हे राम मंदिर ६५ वर्ष जुने असून दरवर्षी मोठ्या उत्साहात रामजन्मोत्सव येथे साजरा केला जातो. पाडव्याच्या दिवशी मंदिरात दिवा लावून त्यांनतर सलग १० दिवस राम नवमीनिमित अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. अखंड पूजा, महाप्रसाद, आरती, रामाची पालखी, राम जन्मोत्सवानिमित्त रामाचे पाळण्यातील दर्शन भाविकांना दिले जाते. 

राम नवमीच्या या दहा दिवसांच्या सोहळ्यात सुमारे १ लाखांहून अधिक भाविक मंदिराला भेट देतात. राम नवमीच्या दिवशी तितक्याच मोठ्या संख्येत भाविक लांब लांब ठिकाणाहून दर्शनास येतात. प्रतिवर्षाप्रमाणे अन्नदान म्हणजेच महाप्रसादाचा लाभ भाविकांना घेता येतो. १० दिवस चालणाऱ्या या उत्सवात राम नवमीच्या दुसऱ्या दिवशी महापूजा झाल्यानंतर उत्सवाची सांगता केली जाते. 

पुढील बातमी
इतर बातम्या