कोरोना आणि दिवाळी!

'दीपावली' आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून, यंदा अनोख्या पद्धतीनं दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. मुंबईसह राज्यावर असलेल्या कोरोनाच्या सावटामुळं यंदा दिवाळी घरीच साजरी करावी लागणार आहे. दिवाळी म्हणजे 'दिपोत्सव' व मिठाईची देवाण घेवाण, मुलांचा उत्साह आणि आनंद म्हणजे फटाके. लॉकडाउनमध्ये कमी झालेल्या प्रदूषणाची पातळी कायम राखण्याची जबाबदारी लॉकडाउननंतर नागरिकांवर आली आहे. शिवाय, यंदा कोरोनामुळं फटाके मर्यादित स्वरूपात फोडण्याचं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

दिवाळीनिमित्त अनेक मुंबईकर एकमेकांच्या भेटीगाठी घेतात. नवनवीन कपडे घालून मोठ-मोठे फटाके लावत दिवाळी साजरी करतात. अनेक ठिकाणी दिवाळी पहाटसारखे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केले जातात. परंतू, कोरोनामुळं राज्य सरकारनं गर्दी न करण्याचं आवाहन केल्यानं यंदा सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी एकत्र गर्दी करण्यावर ही मनाई करण्यात आली आहे. परिणामी देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी दिवाळी साजरी करण्यात येणार आहे.

गणेशोत्सवानंतर मुंबईतील रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली. त्यामुं ही परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारनं काही महत्वाच्या सूचना आखून दिल्या आहेत.

  • दिवाळीदरम्यान मुंबईकरांनी एकमेकांच्या भेटीगाठी घेण्यासाठी घराबाहेर न पडता घरातच दिवाळी साजरी करावी. 
  • दिवाळी पहाटसारखे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करू नयेत. 
  • गर्दी होईल असे कार्यक्रम टाळावे. 
  • शक्यतो ऑनलाईन कार्यक्रमांवर भर द्यावा. 
  • एकंदर कोरोनाचा फैलाव पुन्हा एकदा होईल, असे कोणतेही कृत्य करू नये.

दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. बाजारात लगबग वाढली. खरेदी विक्रीचा उत्साहदेखील वाढला आहे. मात्र या सगळ्यात पुन्हा एकदा गर्दीचा माहोल वाढत आहे. नागरिक मोठ्या संख्येनं घराबाहेर पडत आहेत. परिणामी यंदाची दिवाळी साजरी करताना कोरोनाचे असलेले सावट विसरु नये. उलटपक्षी ज्या प्रमाणे नवरात्रौत्सवादरम्यान सहकार्य केलं तसं सहकार्य करावं आणि दिवाळी साजरी करावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

मुंबईत कोरोनाची रुग्ण संख्या घटत असली तरी पाश्चिमात्य देशात आलेल्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुढील काही महिने यंत्रणांसोबतच नागरिकांनी अधिक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मास्क न वापरण्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जनतेला दिवाळी सुखाची जावी यासाठी सर्वांनी सतर्कता बाळगत जनजागृतीच्या माध्यमातून कोरोनाचा धोका संपला नसल्याची जाणीव करून द्यावी, असं आवाहन करण्यात आले आहे. 

रुग्णसंख्या कमी होत असल्यानं नागरिकांमध्ये मास्क न वापरण्याबाबत बेफिकीरी दाखविली जात आहे. तसं न करता मास्क वापरण्याबाबत मोहीम अधिक तीव्र करावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. शिवाय, फटाक्यांमध्ये मानवी आरोग्यासाठी अत्यंत विषारी घटक आहेत. ज्यात सल्फर ट्रायऑक्साइड, व्हॅनिडियम पेंटॉक्साइड, पोटॅशियम ऑक्साईड्स आणि कॉपर ऑक्साईड्स आहे. हे सर्व विषारी आहे. ही हानिकारक रसायने हवेत सोडली जातात. त्यामुळं पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्यात यावी, असंही आवाहन करण्यात आलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या