यंदा गणपती बाप्पाचे नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

यंदा चौपाटी, तलावांवर गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी पालिकेने परवानगी दिली आहे. परंतु केवळ १० कार्यकर्त्यांना गणेश विसर्जनासाठी जाता येणार असून विसर्जन मात्र पालिकेचे कर्मचारीच करणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. कृत्रिम तलावांना झालेल्या विरोधानंतर महापालिकेनं सोमवारी गणेशोत्सव मंडळे आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती यांची बैठक घेतली.

गतवर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे नैसर्गिक विसर्जनस्थळांवर विसर्जनसाठी बंदी घालण्यात आली होती. त्याला पर्याय म्हणून महापालिकेनं मुंबईत कृत्रिम तलाव उभारले होते. परंतु या तलावात विसर्जन करताना गणेशमूर्तीची विटंबना होत असल्याचे लक्षात आल्यानंतर मोठय़ा प्रमाणात विरोध करण्यात आला. तसेच मंडळांची मूर्ती चार फूट उंचीची असल्याने अशा तलावात विसर्जन करताना कार्यकर्त्यांंना अनेक अडचणींचा सामना करवा लागला, त्या पार्श्वभूमीवर यंदा नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाची परवानगी द्यावी, अशी मागणी समन्वय समितीने केली होती.

या संदर्भात सोमवारी बैठक घेऊन महापालिकेकडून मंजुरी देण्यात आली. परंतु विसर्जनासाठी केवळ १० कार्यकर्ते जातील अशी अट महापालिकेनं घातली आहे. शिवाय इतर निर्बंध गतवर्षीप्रमाणेच असतील असेही अधिकाऱ्यांनी म्हटलं. प्रत्यक्ष दर्शनाबाबतही बैठकीत विचारले गेले, परंतु त्यावर पालिकेने कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. या बैठकीत रस्त्यांवरील खड्डय़ांचाही मुद्दा मांडण्यात आला. गणेश चतुर्थीच्या आत रस्त्यांवरील खड्डे बुजवले जातील, असे आश्वासन यावेळी पालिका अधिकाऱ्यांनी दिले.

विसर्जनाची नियामवली

  • सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची गणेशमूर्ती ४ फूट तर घरगुती गणेशमूर्ती २ फूट उंचीची असावी.
  • विसर्जनाला गर्दी होणार नाही याची काळजी गणेश मंडळानी घ्यावी.
  • ८४ नैसर्गिक गणेश विसर्जनस्थळे असतील.
  • विसर्जनस्थळी पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे मूर्ती द्यावी लागेल.
  • सार्वजनिक मूर्ती विसर्जनासाठी केवळ १० कार्यकर्त्यांंना परवानगी असेल.
  • लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी विसर्जनाला जाऊ नये.
पुढील बातमी
इतर बातम्या