थर लावताना धारावीतील एका गोविंदाचा मृत्यू!

दहीहंडीच्या उत्साहाला अखेर गालबोट लागलं आहे. धारावीतील एका गोविंदाचा थर रचताना पडल्याने  मृत्यू झाला आहे. कुश खंदारे (२०) असं या गोविंदाचं नाव असून सायन रूग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला आहे. त्याच्यावर शवविच्छेदन करण्यात येत असल्याची माहिती सायन रूग्णालयाच्या अधिष्ठाता डाॅ. जयश्री मोंडकर यांनी मुंबई लाइव्हला दिली आहे.

अाकडी अाल्याने कोसळला

धारावीतील बाळ गोपाळ मित्रमंडळ पथकाचा कुश हा गोविंदा होता. सोमवारी दुपारी या मंडळाकडून हंडी फोडण्यासाठी थर लावण्यात येत होते. यावेळी थर लावण्यासाठी कुश चढला असताना अाकडी अाल्याने कुश खाली कोसळला. यात त्याच्या डोक्याला जबर मार लागला. त्याला त्वरीत नजीकच्या सायन रूग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, रूग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला.    

दहीहंडीदरम्यान मुंबईत सोमवारी गोविंदांना दुखापती होण्याच्या अनेक घटना घडल्या असून यात आतापर्यंत ६० गोविंदा जखमी झाल्याची माहिती आहे. केईएम, सायनसह अन्य रूग्णालयात गोविंदांवर उपचार सुरू आहेत. 


पुढील बातमी
इतर बातम्या