फाल्गुनी पाठकच्या कार्यक्रमाला हिरवा कंदील, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

कांदिवली (पश्चिम) येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात यावर्षी दांडीया क्वीन फाल्गुनी पाठक हिचा गरबा कार्यक्रम जल्लोषात होणार आहे. नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दांडिया क्वीन फाल्गुनी पाठक हिच्या कार्यक्रमाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. ही जनहित याचिका उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली.

पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते विनायक यशवंत सानप यांनी ही याचिका केली होती. तसेच या मैदानाचे ‘व्यावसायिकीकरण’ रोखण्याच्या दृष्टीने आदेश देण्याची मागणी केली होती. या क्रीडांगणावरील अशा सर्व कार्यक्रमांना नागरिकांना मोफत प्रवेश देण्याचे राज्य सरकारला आदेश द्यावेत, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली होती. 

याचिका शेवटच्या क्षणाला करण्यात आली. शिवाय याचिकेत अशा प्रकारच्या अन्य कार्यक्रमांना आक्षेप घेण्यात आलेला नाही. या कार्यक्रमाच्या आयोजकांनाही प्रतिवादी करण्यात आले नव्हते. याचिका कोणत्याही अभ्यासविना करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेने संबंधित स्थळ विकास आराखड्यात ‘खेळाचे मैदान’ म्हणून निश्चित केल्याचेही न्यायालयाने म्हटले होते.

याचिकाकर्त्यांनी २०१९ मध्येही अशीच याचिका केली होती. त्यावेळीही न्यायालयाने याचिका कोणत्याही अभ्यासविना करण्यात आल्याचे नमूद केल्यावर याचिककर्त्याने ती मागे घेतली होती, अशी टिप्पणी करून मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळली.

दरम्यान, हा कार्यक्रम केवळ फाल्गुनी पाठक हिचा असल्याने याचिकाकर्ता त्याला लक्ष्य करत असल्याचा दावा आयोजकांतर्फे करण्यात आला.


पुढील बातमी
इतर बातम्या