नवरात्रोत्सवानिमित्त पोलिसांचा चोख बंदोबस्त

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

मुंबईसह देशभरात गुरूवार ७ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सावाला सुरूवात होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचाही नवरात्रोत्सव साध्यापद्धतीनं साजरा करावा लागणार आहे. यासाठी राज्य सरकार व महापालिकेनं नियमावली आखून दिली आहे. शिवाय, पोलिसही सज्ज झाले आहे. नवरात्रोत्सवानिमित्त राज्यभरातील सर्व प्रार्थनास्थळेही खुली करण्यात येणार आहेत. त्यामुळं गर्दी व तणावाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळं ही गर्दी टाळण्यासाठी पोलिस सज्ज झाले आहेत.

कोरोना विषाणूचा संसर्ग कमी झाला असला तरी धोका पूर्णपणे टळला नसल्यानं गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सवामध्ये निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस सतर्क असून नवरात्रीमध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. कोरोना नियमावलीचे पालन, घातपाताचे सावट, अमली पदार्थांचा प्रश्न तसेच, कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे.

मुंबई महापालिका आणि राज्य सरकारनं नियमावली प्रसिद्ध केली आहे. या नियमावलीचे पालन न करणारी मंडळे आणि कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी पोलिसांकडून परिसरात गस्त वाढविण्यात येणार आहे. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना परवानगी देतानाच नियमांचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे बजावण्यात आले आहे.

परिसरातील राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते त्याचप्रमाणे सामाजिक संस्था यांनाही नियमावलीबाबत सूचित करण्यात आले आहे. एका बाजूला नियमावलीकडे लक्ष दिले जात असताना दुसरीकडे समाजकंटांवरही नजर ठेवली जात आहे.

महाराष्ट्र टाइम्स या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी ६ आणि महाराष्ट्र एटीएसने नुकतीच ३ संशयित दहशतवाद्यांना अटक केली. मुंबईसह देशभरात घातपात घडविण्याचा त्यांचा कट होता. याच पार्श्वभूमीवर नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन, संशयास्पद व्यक्ती, ठिकाणे यांची झाडाझडती घेतली जात आहेत. धार्मिक स्थळे, प्रसिद्ध नवरात्रोत्सव मंडळे यांच्या परिसरातील हॉटेल, लॉज यांची तपासणी करण्यात येत आहे. फरार, जामिनावर असलेल्या आरोपींचा आढावा घेण्याच्या सूचना सर्व पोलिसांना देण्यात आल्या आहेत.

कोरोनामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही मंडपात गर्दी करू नये, एकत्र जमू नये अशा सूचना करण्यात आल्या आहेत. मुंबईत तर गरबा, दांडियास सक्त मनाई करण्यात आली आहे. असे असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत निर्बंध शिथिल असल्याने छुप्या पध्द्तीने बंदिस्त ठिकाणी गरबा आयोजित केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा छुप्या कार्यक्रमांवर पोलिसांची नजर असणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या