नवरात्रौत्सव २०१९ : मुंबईची ग्रामदैवत मुंबादेवी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

नवरात्रौत्सवात मुंबईतल्या एकूण एक देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणं हे प्रत्येकालाच शक्य नसतं. पण आमच्या 'जागर आदिशक्तीचा' या विशेष कार्यक्रमात ९ दिवस मुंबईतल्या देवींचं दर्शन करता येणार आहे. फक्त दर्शनच नाही तर या मंदिरांचा इतिहास देखील जाणता येणार आहे. तर सुरुवात करत आहोत मुंबईच्या मुंबादेवीपासून... 

मुंबईची ग्रामदैवत, अशी मुंबादेवीची ओळख. मुंबादेवीच्या नावावरूनच मुंबईचं नामकरण झाल्याचं सर्वांनाच ठाऊक आहे. मुंबादेवी मुंबईतील आद्य रहिवासी कोळी समाजाची आराध्य दैवत. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करून मुंबादेवीचं मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात येतं. नवरात्रीत पाठ वाचनाबरोबर नवमीला हवन केले जाते.

अख्यायिका

पुरातन कथेनुसार ‘मुबारक’ या राक्षसाचा वध करण्यासाठी ब्रह्मदेव, शंकर आणि विष्णू यांच्या तेजापासून ही देवी प्रकट झाली. या शक्तीने मुबारक राक्षसाचा वध केला. मात्र, मरण्यापूर्वी शेवटची इच्छा म्हणून मुबारकने देवीजवळ या परिसरात आपल्या नावाने वास्तव कर, असा वर मातेकडे मागितला. हा वर मान्य करून आदिमाता येथे मुबारक देवी म्हणून राहिली. पुढे हे मंदिर ‘मुंबादेवी’ म्हणून प्रसिद्ध झाले. तर, मुंबा नावाच्या एका कोळी महिलेने या देवीची स्थापना केली व स्वत:चे नावही तिला दिले. त्या दिवसापासून तिला ‘मुंबादेवी’ असे म्हणतात, अशी कहाणीही या मंदिराबाबत सांगितली जाते.

मंदिराची बांधणी

मुंबादेवी मंदिराचे दगडी बांधकाम जुन्या वैभवसंपन्न मंदिरांची आठवण करून देते. मंदिराच्या गाभाऱ्यातील जुन्या धाटणीचे कोरीव काम लक्ष वेधून घेते. मंदिरातील देवीची मूर्ती वालुकामय स्वरूपाची असून तिला दागिन्यांनी मढवलेली आहे. मंदिरात दोन गाभारे असून एका गाभाऱ्यात मुंबादेवी आणि दुसऱ्या गाभाऱ्यात अन्नपूर्णा तसेच जगदंबा मातेची मूर्ती आहे.

मंदिराचा इतिहास

६०० वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी टर्मिनलच्या जागी मुंबादेवीचे जुने मंदिर होते. इंग्रजांच्या काळात मुंबई औद्योगिक नगरी म्हणून उदयाला येत होती. दळणवळणासाठी सोयीस्कर म्हणून छत्रपती टर्मिनल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी इंग्रजांनी स्थानिक कोळी समाजाला विनंती करून काळबादेवी इथल्या भूलेश्वर परिसरात मंदिर बांधले. त्यानंतर १९१५ साली देवीची नव्यानं प्रतिष्ठापना करण्यात आली.


पुढील बातमी
इतर बातम्या