गणेशोत्सवासाठी नवी मुंबई महापालिकेची नवीन नियमावली

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

 मुंबई महापालिकेने गणेशोत्सवाबाबत नियमावली जारी केली आहे. या नियमावलीनुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना गणेशोत्सव मंडप उभारण्यासाठी ऑनलाईन ई-सेवा संगणक प्रणालीद्वारे ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करावा लागणार आहे.  नियमावलीनुसार कोणालाही वर्गणीसाठी सक्ती करता येणार नसल्याच्या सूचना गणेश मंडळांना देण्यात आल्या आहेत.

गणेशोत्सवासाठी नियमावली

- सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडळांनी गणेशोत्सवासाठी महानगरपालिका किंवा स्थानिक प्रशासन यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक.

- कोरोनाचा विचार करता महानगरपालिका तसेच संबधित स्थानिक प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांनुसारच मंडप उभारण्यात यावेत.

- उत्सवासाठी वर्गणी किंवा देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा, वर्गणीची सक्ती करू नये.

- घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट करताना भपकेबाजपणा टाळावा.

- सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींसाठी ४ फूटांची, तर घरगुती गणेशमूर्तींसाठी २ फूटांची मर्यादा.

- यावर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमूर्तींऐवजी घरातील धातू किंवा संगमरवर अशा मूर्तींचे पूजन करावे.

-  गणेशमूर्ती शाडू मातीची किंवा पर्यावरणपूरक असल्यास तिचे विसर्जन शक्यतो घरच्याघरीच करावे.

- विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिक निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करावे.

- जाहिरात प्रदर्शनामुळे गर्दी जमणार नाही याची काळजी घ्यावी.

- आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्याला प्राधान्य द्यावे.

- सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी रक्तदानासारखे आरोग्य विषयक उपक्रम किंवा शिबिरांचे आयोजन करण्याला प्राधान्य द्यावे. अशा कार्यक्रमांद्वारे करोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजारांबाबत जनजागृती करावी.

- राज्याने लागू केलेल्या करोना प्रतिबंधक निर्बंधांना गणेशोत्सव काळात शिथिलता मिळणार नाही. आरती, भजन, कीर्तन किंवा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच ध्वनी प्रदूषणाबाबतच्या नियमांचे पालन करावे.

- श्रीगणेशाचे दर्शन ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट किंवा फेसबुक अशा साधनांद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्याचा प्रयत्न करावा.

- गणपती मंडपांमध्ये निर्जतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे (फिजीकल डिस्टन्सींग) तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

- श्रीगणेशाचे आगमन किंवा विसर्जनाच्या मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे.

- लहान मुलांनी आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. तसेच, संपूर्ण चाळीतील आणि इमारतीमधील सर्व घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढणे टाळावे.

- महानगरपालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने गणेशमूर्तीच्या विसर्जनाकरिता कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी.

- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैदयकिय शिक्षण विभाग तसेच संबधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर आणि प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

- मंडप उभारणीसाठी परवानगी मागणारा अर्ज वरील महानगरपालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाकडे http://www.rtsnmmconline.com या वेबसाईटवर ऑनलाईन सादर करावा.

- लेखी परवानगी प्राप्त झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारच्या मंडपाची उभारणी करु नये.

- गणेशोत्सव सुरु होण्याच्या १० दिवस अगोदर कोणतेही परवानगी अर्ज विभाग कार्यालयात स्विकारले जाणार नाहीत किंवा मंडप उभारणीसाठी परवानगी दिली जाणार नाही.

पुढील बातमी
इतर बातम्या