विसर्जनानंतर गणेशमूर्तीच्या मातीत तुळशीच्या रोपट्यांची लागवड

सध्या घरोघरी गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. काही दिवसांसाठी घरी किंवा मंडळात विराजमान झालेला बाप्पाच्या विसर्जनादरम्यान काही गणेशभक्तांना वाईट अनुभव येतात. या वाईट अनुभवांना कंटाळून गेलेल्या चेंबूरच्या दीपक मेघनानी यांनी घरगुती पण अनोख्या पद्धतीनं बाप्पाची आरास आणि घरगुती विसर्जनाची तयारी केली. विशेष म्हणजे या गणेशमूर्तीच्या मातीत तुळशीच्या रोपांची लागवडही केली.

विसर्जनासाठी काचेचा टँक

गेल्या १९ वर्षांपासून सिव्हिल इंजिनिअर असलेल्या दीपक मेघनानी यांच्या घरात बाप्पा विराजमान होतात. मात्र २०१५ साली गणपती विर्सजन करताना मेघनानी यांना वाईट अनुभव आले. त्यामुळे त्यांनी तीन वर्षांपूर्वी स्वत: लाकडाचा टेबल बनवला, त्याखाली गणपती विसर्जनासाठीचा काचेचा टँक ठेवला जातो.

मेघनानी कुटुंबातील गणेशाची मूर्ती शाडूच्या मातीपासून बनवली असल्यानं ती त्या टॅंकमध्ये अवघ्या ३० मिनिटांत विरघळते. त्यानंतर या टँकमधील पाणी आणि माती वेगळी करून ही माती कुंड्यांमध्ये भरली जाते. आणि त्यात तुळशीची रोपटी लावली जातात. विशेष म्हणजे दीपक मेघनानी यांचा पाच दिवसांचा घरगुती गणपतीची सजावट फुलं आणि इकोफ्रेंडली साहित्यांचा वापर करून करण्यात येते.

गणेशमूर्ती विसर्जनासाठी पालिका जय्यत तयारी करत असली तरी अनेक ठिकाणी कृत्रिम तलावांत विसर्जन करणारी मुलं अशोभनीय वर्तन करतात. अयोग्य पद्धतीच्या विसर्जनामुळे गणेशमूर्तीचे हात-पाय तुटतात. हे सर्व टाळण्यासाठी मी घरच्या घरीच काचेचा आकर्षक टॅंक बनवून विसर्जन करण्यास सुरुवात केली. 

- दीपक मेघनानी, चेंबूर रहिवासी

तसचं बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्वांना मोदक, पेेढे, बर्फी आणू नका तर त्याऐवजी डाळ किंवा इतर धान्य बाप्पाच्या चरणी अर्पण करा, असं सांगितलं असून ते सर्व धान्य गणेशोत्सवानंतर अनाथलयाला दान करतो, असंही दीपक म्हणाले.

पुढील बातमी
इतर बातम्या