होळी आणि रंगपंचमीसाठी घरच्या घरी बनवा नैसर्गिक रंग

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

पूजा, पुरणपोळी आणि रंगांची लयलूट करण्याचा सण म्हणजे होळी. आनंद आणि उत्साहानं परिपूर्ण अशा या सणात सारेच रंगात न्हाऊन निघतात. पण बाजारातून आणलेल्या रंगात केमिकल्स असतात. याचा परिणाम तुमच्या त्वचेवर आणि केसांवर होतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला घरच्या घरी नैसर्गिक रंग कसे बनवावेत याच्या काही टिप्स देणार आहोत.

लाल रंग

  • रक्तचंदनाच्या पावडरचा वापर करून लाल रंग तयार करता येतो.
  • टॉमेटो आणि गाजराचा रस पाण्यात मिसळा आणि ते पाणी वापरा.

गुलाबी रंग

  • किसलेला बीट पाण्यात टाकून तुम्हाला गुलाबी किंला लालसर रंग मिळेल.
  • मैद्यामध्ये बिटाचा रंग घेऊन त्यात थोडं पाणी घाला. यामुळे तुम्हाला गुलाबी रंग मिळेल.

पिवळा रंग

  • झेंडूची फुलं किमान पाच ते सहा तास गरम पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर पाणी गाळून घ्या. पिवळ्या रंगाचे पाणी तयार होईल. पिचकारी किंवा फुग्यात तुम्ही हे पाणी भरू शकता.
  • कोरडा पिवळा रंग तयार करण्यासाठी हळदीचा वापर करू शकता. यासाठी हळदीच्या दुप्पट बेसन किंवा मुलतानी माती घालून पिवळा रंग तयार करू शकता. हा लेप त्वचेसाठी फायदेशीर ठरेल.
  • मैदा आणि हळद या मिश्रणात थोडं पाणी घातलंत तरी पिवळा रंग तयार होईल. 

नारंगी रंग

  • डाळिंबाची साल गरम पाण्यात आठ ते नऊ तास भिजत ठेवा. त्यानंतर हे पाणी गाळून वापरा,
  • पळसाची फुलं रात्रभर पाण्यात भिजवून किंवा पळसाची फुलं गरम पाण्यात उकळूनही तुम्ही हे पाणी वापरू शकता.

हिरवा रंग

  • पालकाची प्युरी करून किंवा कडुलिंबाचा पाला वाटून तो गाळून घ्या. या पाण्याचा वापर पिचकारी आणि फुग्यांसाठी करता येऊ शकतो. जंतुनाशक म्हणून कडुलिंबाचं पाणी फायदेशीर ठरेल.
  • कोरड्या हिरव्या रंगासाठी हिनाची सुकी पावडर वापरू शकता. पण या हिनाच्या पावडरमध्ये पाणी टाकून वापरण्याआधी जरा विचार करा. कारण ओली हिना पावडर लावली तर रंग शरीरावर तसाच राहतो. त्यामुळे काळजीपूर्वक याचा वापर करा.
  • मैद्यात हिरवा फूड कलर आणि पाणी घालून तुम्ही हिरवा रंग बनवू शकता. तुम्हाला फुड कलर वापरायचा नसेल तर पुदिना किंवा पालकाचा रस वापरू शकता.

चॉकलेटी रंग

  • चॉकलेटी रंग बनवण्यासाठी तुम्ही खायच्या पानांत वापरली जाणारी कात वापरु शकता.
  • चहा किंवा कॉफी उकळून ती गाळून थंड करुन त्याचे पाणी तुम्ही वापरू शकता.
  • मैद्यामध्ये चॉकलेटी फूड कलर आणि थोडं पाणी घालून तुम्ही चॉकलेटी रंग मिळवू शकता.

काळा रंग

  • आवळ्याची पुड सात ते आठ तास लोखंडी भांड्यात भिजवून ठेवल्यास काळा रंग मिळतो.
  • काळ्या द्राक्षांचा रस पाण्यात मिसळा आणि ते पाणी गाळून वापरा.


पुढील बातमी
इतर बातम्या