नक्षीकाम केलेल्या घागरा-चोलीची खरेदी करायचीय, मग इथे या

बुधवारपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. मग काय दांडिया आणि रास गरबा खेळताना घागरा चोली तर घालायचीच. पण सुंदर, नक्षीकाम केलेले फॅशनेबल आणि तेही स्वस्तातले घागरा चोली कुठे मिळणार? म्हणून टेन्शनमध्ये असाल तर दादर, घाटकोपर, लालबाग या सर्व ठिकाणी या. कारण येथे सुंदर मोराचं नक्षीकाम केलेले आकर्षक घागरे, स्वस्तातले चनिया चोली, कवड्या व मण्यांचा वापर करून तयार केलेले रंगीबेरंगी जॅकेट यांसह विविध वस्तू बाजारात दाखल झाल्या आहेत.

राजस्थानी घागऱ्यांची चलती

गरबा-दांडिया खेळण्यासाठी वेशभूषेचा महत्त्वाचा भाग असलेल्या राजस्थानी घागऱ्यांची सध्या चलती आहे. त्यामुळे खास नवरात्रोत्सवासाठी अनेक कारागीर आणि विक्रेते मुंबईत दाखल झाले आहेत. 

त्यात सुंदर नक्षीकाम केलेले घागरा, साड्या, चनिया चोली, धोती कुर्तेही येथे विक्रीसाठी उपलब्ध आहे. याशिवाय राजस्थान, मेवाड, बडोदा, सुरत, मध्य प्रदेश या ठिकाणी खास तयार करण्यात आलेले बांधणीचे रंगीबेरंगी चनिया चोलीही बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे.  

दागिनेही उपलब्ध

कच्छी भरतकाम केलेल्या चनिया चोली सर्व वयोगटांतील महिला वर्गासाठी उपलब्ध असून मिरर वर्क, बॉर्डर स्टाइल, गोटा वर्क अशी विविध कारागिरी केलेल्या चनिया चोली या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सध्या खास राजस्थानी स्टाइल कुर्ती आणि धोत्यांनाही मागणी आहे. तसंच पारंपरिक गुजराती, मारवाडी पद्धतीचे कपडे बाजारात सर्वाचं लक्ष वेधून घेत आहेत. त्याशिवाय खास महिलांसाठी विविध रंगाचे झुमके, बांगड्या, ऑक्साईडची ज्वेलरी, मिरर वर्क असलेले दागिने या बाजारात उपलब्ध झाले आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या