Women's day special- बेवारस मृतदेहांची 'मुक्तीदाता'

  • सूरज सावंत
  • दखल

हिंदू धर्मात जिथं महिलांना स्मशानभूमीची पायरी चढणं म्हणजे पाप मानलं जातं. तिथंच दादर रेल्वे पोलिस ठाण्यात शिपाई पदावर असलेल्या नयना दिवेकर २०११ पासून रेल्वे अपघातांमध्ये मृत्यू झालेल्या बेवारस व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्याचे काम करत आहेत. आतापर्यंत ५०० हून अधिक बेवारस मृतदेहांवर दिवेकर यांनी अंत्यसंस्कार केले आहेत. हे काम करण्यासाठी त्यांना कुठून बळ मिळालं? कुठून प्रेरणा मिळाली? हे जाणून घेण्याचा प्रयत्न 'जागतिक महिला दिना'निमित्ताने 'मुंबई लाइव्ह'ने केला.

मोठ्या हिमतीने काम स्वीकारलं

सुरूवातीला रेल्वे अपघातात छिन्नविछिन्न झालेले मृतदेह पाहण्याची देखील कुणाची हिंमत होत नव्हती. त्यामुळे हे काम करण्यास सहसा कुणी पुढे येत नव्हतं. पण नयना यांनी ही जबाबदारी स्वीकारल्याने पोलिस ठाण्यातील अनेकांच्या भुवया उंचावल्या. ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर अनेकांनी ''नयना यांना हे काम तुझासाठी नाही. हे काम तुला जमणार नाही, महिलांनी अशी कामे करायची नसतात'', असं म्हणत त्यांचा आत्मविश्वास खच्ची करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी मोठ्या हिंमतीने हे काम स्वीकारलं.

अपघातात मरण पावलेल्यांचा मृतदेह पोलिसांच्या ताब्यात आल्यावर सुरुवातीला ८ दिवस त्या मृतदेहाच्या नातेवाईकांचा शोध पोलिसांकडून घेण्यात येतो. त्यानंतर कोणीही वारसदार आला नाही. तर अशा मृतदेहांना बेवारस जाहीर करण्यात येतं व त्याच्यावर पोलिसांकडून अंत्यसंस्कार केले जातात.

स्वत:च्या पदरचे पैसे

रेल्वेच्या हद्दीत वर्षाला किमान १५० हून अधिक बेवारस मृतदेहांची नोंद होते. रेल्वे अपघातात मृत पावलेल्या बेवारस व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी सरकारकडून फक्त १ हजार रुपये दिले जातात. ही रक्कम अत्यंत तुटपुंजी ठरते. तरी त्यात स्वत:च्या पदरचे पैसे घालून मृतदेहांवर पूर्णपणे विधीवत अंत्यसंस्कार करण्यावर नयना दिवेकर यांचा भर असतो.

बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करून त्या बेवारस देहाला मोक्ष देण्याचे काम आपल्या हातून होते, हिच आपल्यासाठी समाधानाची बाब आहे. यासाठी रेल्वेच्या पोलिस उपायुक्त रुपाली अंबुरे यांचा मोलाचा पाठिंबा देखील आपल्याला मिळत असल्याचे नयना दिवेकर सांगतात. अशा पद्धतीने पोलिस दलात क्वचितच आढळााऱ्या माणूसकीचे दर्शन नयना यांच्या रुपात आपल्याला घडते. जागतिक महिला दिनानिमित्ता त्यांच्या कामगिरीला 'मुंबई लाइव्ह'चा सलाम.

पुढील बातमी
इतर बातम्या