फ्ली बाजार कॅफे...खाण्याचं एक भन्नाट ठिकाण!

तुमच्या परिसरात आठवड्याचा बाजार भरतो का? नक्कीच भरत असेल. हल्ली असे बाजार भरण्याची नवीन रीतच सुरू झाली आहे. पण हा बाजार आठवड्यात एक दिवस भरतो. त्या आठवड्याला बाजारात जायला जमलं तर ठीक, नाही तर मग पुढच्या आठवड्याची वाट बघा. मुंबईत किती तरी फेस्टिव्हल आयोजित केले जातात. पण ते फक्त दोन किंवा जास्तीत जास्त तीन दिवसांसाठी असतात. पण मुंबईत आता रोज असा बाजार किंवा फेस्टिवल भरवण्यात येणार आहे. जिथे तुम्ही कधीही जाऊ शकता आणि मजा, मस्ती करू शकता. शॉपिंगपासून ते खाण्यापिण्यापर्यंत सर्व काही तिकडे उपलब्ध असेल.

'फ्ली बाजार कॅफे'ची खासियत

कॅफे म्हटलं की फक्त आपण तिथं खाऊ पिऊ शकतो. खाण्यामध्ये देखील अनेक मर्यादा असतात. पण 'फ्ली बाजार कॅफे'अंतर्गत तुम्हाला वेगवेगळे पदार्थ एकाच छताखाली चाखता येणार आहेत. जवळपास १३ फेमस रेस्टॉरंट एकाच छताखाली येणार आहेत. सोशल (बार), एल चापो (मॅक्सिकन), चकना बाय सोम, युगो सुशी (जॅपनिज), सुपर पाओ, डेल इटालिया (इटालियन), लखनवी (टुंडे कबाब), द बोहरी किचन, हुंग ली, व्हॉट्सअपम (साऊथइंडियन), डोप कॉफी बाय रोस्टेड टुडे, गोलिया बटर चिकन आणि बे बर्गर यांचे आऊटलेट्स इथं असतील. फक्त एवढंच नाही, तर 'प्रॉपशॉप २४' नावाचं शॉप इथं असेल. जिथे तुम्ही शॉपिंग देखील करू शकता. यासोबतच तुम्हाला इथं म्युझिकचा आनंद देखील घेता येईल.

संकल्पना कुणाची?

'फ्ली बाजार कॅफे' या संकल्पनेमागे रियाज अमलानी हा तरूण आहे. सोशल, स्मोक हाऊस डेली, स्लींक अँड बारडॉट यासारख्या प्रसिद्ध रेस्टॉरंटच्या यशामागे रियाजचाच हात आहे. क्रॉफर्ड मार्केट, जोहरी बाजार आणि दिल्ली हाट अशा बाजारपेठांना डोळ्यांसमोर ठेऊन फ्ली बाजार कॅफेचं डिझाईन करण्यात आलं आहे. मुंबईकरांना नेहमीच खाण्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स लागतात. मग बर्गर असो वा डोसा किंवा अजून कुठल्या देशातील पदार्थ असो. फ्ली बाजार कॅफेमध्ये देखील मुंबईकरांना हेच अनुभवता येणार आहे.

कुठे?

७ एप्रिलला हा फ्ली बाजार कॅफे सर्वांसाठी खुला करण्यात येईल. तुम्हाला सुद्धा एकाच छताखाली या सर्व गोष्टींचा अनुभव घ्यायचा असेल तर लोअर परेलच्या कमला मिल कपांऊंडमधल्या फ्ली बाजार कॅफेला नक्की भेट द्या. फ्ली बाजार कॅफे, युनिट ५, पहिला मजला, ट्रेड व्यू बिल्डींग, ऑसिस सिटी, लोअर परेल इथं दुपारी १२ ते रात्री १ वाजेपर्यंत हा कॅफे ओपन असेल. 


हेही वाचा

आता मेकडॉनल्डसुद्धा होणार आरोग्यदायी!

पुढील बातमी
इतर बातम्या