या मांसाहारी थाळींचा स्वाद एकदा तरी चाखाच!

चिकन थाळी, मटण थाळी, सुरमई थाळी, बांगडा थाळी, कोळंबी थाळी... आहाहा... ही नावं वाचून तोंडाला पाणी सुटलं असेल ना? अरे यार श्रावण सुरू आहे. त्यात असं काही वाचून नॉनव्हेज खाण्याची इच्छा जागृत झालीय. त्यात आईनं तर घरात काही नॉनव्हेज बनणार नाही अशी तंबी दिली आहे. यामुळे तुमचा थोडा हिरमोड झाला असेल. डोंट वरी... आम्ही आहोत ना. आज आम्ही तुम्हाला अशा काही हॉटेल्सची नावं सांगणार आहोत जिथे तुम्ही महाराष्ट्रीयन मांसाहारी थाळीचा आस्वाद घेऊ शकता.

१) समर्थ भोजनालय

१९७२ साली रामचंद्र प्रभू उर्फ रामभाऊ प्रभू यांनी पत्नीच्या मदतीनं घरगुती स्वरूपाची खानावळ सुरू केली. त्यावेळी जेवायला येणारी गिऱ्हाईकं म्हणजे आजुबाजूचे सर्व मध्यमवर्गीय मराठी गिरगावकर चाकरमानी! बरीचशी कनिष्ठ मध्यमवर्गीयच मंडळी. अप्रतिम अशी घरगुती चव, वातावरणही घरगुती आणि दरही वाजवी असल्यानं खवय्यांची गर्दी असते.

आज या खाणावळची जबाबदारी रामभाऊ यांची मुलं संजय आणि विश्वनाथ सांभाळतात. सुरमई, बांगडा, पापलेट, बोंबिल, कोलंबी, मांदेली, मुडदुशा, गाबोळी, कुर्ल्या. फक्त ऐवढंच नाही तर मटण वडे, कोंबडी, सुकं मटण, कोकम कढी असा बेत या खानावळीत शिजतो.

कुठे : २२/बी, रेले बिल्डींग, क्रांतिवीर बालागुरू मार्ग, चर्नी रोड, गिरगाव पोस्ट ऑफिस जवळ, मंगळ वाडी, गिरगाव

२) हॉटेल गावकरी

प्रभादेवी इथलं हे हॉटेल महाराष्ट्रीयन पद्धतीच्या जेवणासाठी आणि साधेपणासाठी अधिक ओळखले जाते. त्यांच्याकडे अंडा थाळी, चिकन, मटण आणि सीफूड थाळी उपलब्ध आहे. याशिवाय तुम्ही जर कधी तांबडा-पांढरा रस्सा खाल्ला नसेल तर इथं तुम्ही त्याचाही आस्वाद घेऊ शकता. दोन जणांसाठी ७०० रुपये पुरेसे आहेत.

कुठे - शॉप ५, सुर्योदय हाऊसिंग सोसायटी, सामना प्रेसच्या पुढे, प्रभादेवी

३) पुरेपुर कोल्हापुर

तांबडा आणि पांढरा रस्सा ही कोल्हापुरची खासियत. आता हे खाण्यासाठी तुम्हाला कोल्हापुरला जाण्याची आवश्यक्ता नाही. तुम्हाला मुंबईत सुद्धा कोल्हापुर पद्धतीच्या जेवणाची चव चाखता येईल. विले पार्ले इथलं पुरेपुर कोल्हापुर हे हॉटेल खवय्यांसाठी पर्वणीच आहे. चिकन, मटण आणि सीफूड असे पर्याय तिकडे उपलब्ध आहेत. इथला तांबडा आणि पांढरा रस्सा हा झणझणीत असतो. नक्की तुम्हाला घाम फुटेल.

कुठे : १ आणि २, आदित्य अपार्टमेंट, पार्लेशवर रोड, पार्लेशवर मंदिर, विले पार्ले

४) सत्कार हॉटेल

मांसाहर खाणाऱ्यांसाठी आणखी एक पर्याय म्हणजे सत्कार. चिकन, मटण, खेकडा मासळी अशा अनेक थाळी इथं उपलब्ध आहेत. पण सध्या चिकन आणि वडे याला अधिक पसंती दिली जाते.

कुठे : शॉप १५, ड्रिमलँड बिल्डिंग, रेल्वे स्टेशन समोर, जय प्रकाश नगर, गोरेगाव (पू.)

५) स्वाद घरचा

याठिकाणी चिकन थाळी, मटण थाळी, मासे थाळी, मांदेली फ्राय, बांगडा फ्राय, बोंबील फ्राय, सुरमई फ्राय, पापलेट फ्राय, कोळंबी फ्राय, हलवा फ्राय इथं मिळतात. मासे थाळीतील प्रमुख प्रकार पापलेट फ्राय. पापलेटच्या डोक्याचा आणि शेपटीच्या भागाचा रस्सा बनविला जातो. मधला भाग तळतात.

कुठे : शॉप क्र. १, श्रीजी आर्केड, स्पेंडॉर, न्यू ब्रम्हांड, हिरानंदानी इस्टेट जवळ, ब्रम्हांड हिरानंदानी लिक रोड, घोडबंदर मार्ग, ठाणे


हेही वाचा

बार्बिक्यू बाईक राईडसाठी तयार आहात?

पुढील बातमी
इतर बातम्या