World Vada Pav Day : वडापावला फ्यजुन तडका, ट्राय करा वडापावचे 'हे' ७ हटके प्रकार

वडापाव म्हणजे मुंबईकरांचा जीव की प्राण. सर्वांचा लाडका हाच वडापाव आता केवळ भूक भागवण्यापूर्ता मर्यादित राहिलेला नाही. तर खवय्यांचे चोचले पुरवणारा किंग मेकर ठरला आहे.

दर पाच मैलावर जशी भाषा बदलते, तसा वडापावचाही अवतार बदललेला असतो. भाजीची चव, त्यासोबत दिली जाणारी विशिष्ट प्रकारची चटणी यामुळे आपापल्या वडापावला वेगळी ओळख देण्याचा यशस्वी प्रयत्न अनेकांनी केला आहे.

World Vada Pav Day निमित्त आज आम्ही तुम्हाला अशाच काही वेगळ्या प्रकारच्या वडापावची ओळख करून देणार आहोत. हे वडापाव तुम्ही एकदा का होईना पण ट्राय केलेच पाहिजेत.

१) चीज वडापाव

मॅक आलू टिक्कीसारखे परदेशी प्रकारांना भारतात पसंती मिळत आहे. हे पाहता आता बर्गर आणि वडापाव या दोघांचे फ्युजनही मुंबईकरांसाठी उपलब्ध झाले. त्यातीलच एक प्रकार म्हणजे चीज बर्स्ट वडापाव. बरं चीज हा प्रकार सर्वांच्याच पसंतीचा. त्यामुळे बोरिवलीतील एका जॉईंटमध्ये पारंपरिक वडापावला चीजची जोड दिली गेली.

आतल्या भागात बटाटा, बीन्स, जेलिपिनो, स्पायसी चिपोटले आणि चीज असते. तर त्याला बेसनाचे आवरण. पावात वड्यासोबतच तुम्हाला लेट्युस ( कोबिसारखा प्रकार), टॉमेटो, मेओनीज आणि चीजचे स्लाईस हे सगळं असतं. एकप्रकारे तुम्ही याला इंडियन बर्गर म्हटलंत तरी चालेल.

कुठे : हंगरी जेडी, शुभाराम मैदानाजवळ, एस्के रिसॉर्टच्या पुढे, लिंक रोड, बोरिवली पश्चिम, मुंबई

किंतम : १५०

२) पाव भाजी वडापाव

तुमच्या फेवरेट वाडापावला मसालेदार ट्विस्ट. वडापावा आणि पाव भाजी हे दोन्ही प्रकार तसे वेगवेगळे. पण जर तुम्हाला पावभाजीची चव वडापावमध्ये मिळाली तर? असं शक्य आहे का? असाच प्रश्न तुम्हाला पडला असेल.

तर आहे की शक्य फ्युजनचा जमाना आहे. मुलुंडच्या खाऊ गल्लीतील मंडिया मसाला या स्टॉलवर तुम्हाला पाव भीजी वडापाव चाखता येईल.

याचे वैशिष्ट्य म्हणजे पाव मसालेदार भाजीमध्ये टोस्ट केला जातो. त्यानंतर त्या पावात वडा भरला जातो. असा तयार होतो पाव भाजी वडापाव...

कुठे : मंडिया मसाला, पुरुषोत्तम खेराज रोड, केशव पाडा, मुलुंड पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र 400080

किंमत: २५ रुपये

३) हिडन वडापाव

हिडन पाव? नाव थोडं विचित्र वाटतं ना? पण असं नाव का बरं दिलं असेल? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आतापर्यंत वडा हा पावात टाकून खाल्ला जात होता. पण आता याच्या अगदी उलटं झालं आहे. फर्जी कॅफेमध्ये वड्यामध्ये पाव टाकून खाल्ला जातो.

फर्जी कॅफेमध्ये वडा पावला एक ट्विस्ट देण्यात आलं आहे. ट्विस्ट असं की पावाला बटाट्याचं कोटिंग देऊन तळलं जातं. म्हणजे वडापावच्या आत तुम्हाला पाव खाता येतो. एक प्रकारे वड्याच्या आत पाव दडलेला असतो. त्यामुळे याला वडा पाव बोलायचं की पाव वडा हे तुम्हीच ठरवा.

कुठे : फर्जी कॅफे, तळ मजला, कमला मिल्स, एस.बी. मार्ग, लोअर परेल

किंमत : अंदाजे २९५

४) चिवडा वडापाव

१९७३ मध्ये हा वडापाव स्टॉल सुरू झाला होता. इथं देण्यात येणारा वडापाव हा चिवड्यासोबत दिला जातो. लसणाची चटणी, कापलेली कैरी, चणे, कोथिंबीर आणि कॉर्नफ्लेक्स यापासून हा चिवडा बनवलेला असतो. त्यामुळे हा वडापाव खाण्याची मजा काही औरच.

वडापावसोबत कॉनफ्लेक्स म्हणजे प्रत्येक बाईटमध्ये तुम्हाला क्रंचिनेसचा अनुभव येईल. वडापाव खाताना मध्ये-मध्ये येणाऱ्या कैरीच्या तुकड्यांची चव जिभेवर दिर्घकाळ राहते. ठाकूर स्नॅक्स इथं दिवसाला अंदाजे १००० वडापाव विकले जातात.

कुठे : ठाकूर स्नॅक्स (ठाकूर वडापाव), पी.पी. चेंबर्सच्या पाठी, डोंबिवली

किंमत : अंदाजे २५ ( दोघांचे)

५) मॅगी वडापाव

मुंबईतल्या प्रत्येक गल्लीत एक तरी वडापावचं दुकान तुम्हाला दिसेलच. इथल्या प्रत्येक दुकानानं आणि तिथं मिळणाऱ्या वडापावनं आपल्या चवीनं स्वत:ची वेगळी ओळख केली आहे. यापैकीच एक आहे घाटकोपरमधील लक्ष्मण ओम वडापाव. आता तुम्ही म्हणाल यात काय खास? पण इतर वडापावसारखा हा वडापाव नाही.

पहिल्यांदाच मॅगी आणि वडापाव हे दोन वेगळे पदार्थ एकत्र करून मॅगी वडापाव तयार करण्यात आला. हो... तुम्ही अगदी बरोबर ऐकलंत. मॅगी वडापाव... आतून सॉफ्ट आणि बाहेरून स्क्रिस्पी असा हा वडापाव... आहे की नाही भन्नाट प्रकार... हा वडापाव बनवण्यासाठी स्पेशल मसाल्यांचा वापर केला जातो. हा वडापाव तुम्हाला त्यांनी बनवलेल्या चटणीसोबत सर्व्ह केला जातो.

कुठे : लक्ष्मण ओम वडापाव, १९, बिल्डींग १०४, गरोडिया नगर, घाटकोपर (पू.)

किंमत : अंदाजे १०० ( दोघांचे)

६) नॉन व्हेज वडापाव

व्हेज म्हणून ओळखला जाणारा हा वडापाव आता नॉनव्हेजमध्ये देखील उपलब्ध झाला आहे. 'पॅक अ पाव' या आऊटलेटमध्ये आता चिकन वडापाव देखील खाता येणार आहे. वांद्रे आणि कॅम्पस कॉर्नर इथल्या पॅक अ वडापावच्या दोन आऊटलेट्सला मुंबईकरांनी चांगलीच पसंती दिली आहे. त्यानंतर पॅक अ पावचं तिसरं आऊलेट आता वर्सोवामध्ये देखील ओपन करण्यात आलं आहे.

चिकन वडापावच नाही तर वडापाव या प्रकारात त्यांनी अनेक आमूलाग्र बदल केले आहेत. 'बटर चिकन पाव' आणि 'सुमित्रन स्मोकिन पाव' हे दोन भन्नाट प्रकार पण तुम्ही ट्राय करू शकता. सुमित्रन स्मोकिन पाव यामध्ये चिकन आणि स्मोक्ड कर्ड असं कॉम्बिनेशन असेल. फक्त चिकनच नाही, तर अनेक वेगवेगळ्या प्रकारांमध्ये तुम्ही वडापाव टेस्ट करू शकता. पनीर, चिकन, मटण, कबाब, मशरूम पाव असे अनेक प्रकार तुम्ही ट्राय करू शकता.

कुठे : मीरा अपार्टमेंट, शॉप नंबर 3, वर्सोवा लिंक रोड, अंधेरी (प)

किंमत : २०० रुपयापासून सुरुवात

७) चीज फॉनडू वडापाव

चीज प्रेमींसाठी तर हा वडापाव पर्वणीच आहे. छोटे छोटे (मिनी) झणझणीत ७-८ वडापाव तुम्हाला एका बाऊलसोबत सर्व्ह केले जातात. या बाऊलमध्ये स्पेशल बनवलेलं चीज असतं.

तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की वडापाव अख्खाच्या अख्खा चीजनं भरलेल्या एका बाऊलमध्ये डिब करायचेत आणि त्यांचा आस्वाद घ्यायचाय.

कुठे : एमआरपी, तिसरा मजला, ओम हिरा पन्ना मॉल, ओशिवरा, अंधेरी

किंमत : अंदाजे ७०० ( दोघांचे)


पुढील बातमी
इतर बातम्या