बीकेसीत होणार फुटबॉल ग्राऊंड

मुंबई, ठाण्यातील फुटबॉलपटूंना दर्जेदार फुटबॉल ग्राऊंड उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. यापैकी एक फुटबॉल ग्राऊंड बीकेसीत उभारणार असल्याची माहिती मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशन (एमडीएफए)चे चेअरमन आदित्य ठाकरे यांनी दिली. आदित्य यांच्या हस्ते मंगळवारी इस्लाम जिमखान्यात ‘एमडीएफए’च्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या संकेतस्थळावर ‘एमडीएफए’ची संपूर्ण माहिती, स्कोअर लिस्ट आदी उपलब्ध असेल. ही माहिती लवकरच व्हॉट्सअपवरही उपलब्ध करुन देण्यात येईल. आयलीग चॅम्पियन एलवाल एफसी आणि मुंबईचे कोच खालीद जामील, मुंबईकर फुटबॉलपटू जयेश राणे तसेच आशुतोष मेहता यांचे देखील कौतुक त्यांनी केले.

आदित्य पुढे म्हणाले, येत्या पावसाळ्यात मान्सून लीग चषक आणि बीचू स्नूकर अशा दोन मोठ्या फुटबॉल स्पर्धा भरवण्यात येणार आहेत. मुंबईत सर्वाधिक फुटबॉल खेळले जाते. ‘विफा’ने आयोजित केलेल्या सर्व आंतरजिल्हा स्पर्धा ‘एफडीएफए’ने जिंकलेल्या आहेत. त्यामुळे शहरातील प्रतिभेला आणखीन वाव देण्यासाठी मुंबईतील ‘बीकेसी’ आणि ठाण्यात फुटबॉल ग्राऊंड बनविण्यासाठी जागा मिळण्याची विनंती संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे.

विलक्षण कामगिरी करण्याचे एजवाल एफसीचे स्वप्न प्रशिक्षक खालीद यांच्या मार्गदर्शनाखालीच पूर्ण होऊ शकते. जयेश आणि अशुतोष या दोघांचे ईशान्य मुंबईतील क्लबसाठी मोलाचे योगदान आहे. हे दोन्ही खेळाडू ‘एमडीएफए’तले असल्याचा खूप अभिमान वाटतो. यंदा मुंबई एफसीला आय-लीग मधून बाहेर काढण्यात आले आहे. मुंबई एफसी आय-लीगमध्ये सहभागी होणारा शहरातला एकमेव क्लब आहे. पण मला खात्री आहे की पुढील वर्षी हा क्लब नक्कीच परतेल. मुंबईकर म्हणून मी मुंबई एफसीला नेहमीच प्रोत्साहन देईन, असेही आदित्य यांनी स्पष्ट केले.

पुढील बातमी
इतर बातम्या