योगा कराल तर, फायद्यात रहाल!

शरीराला तंदुरूस्त ठेवण्यासाठी योगा अत्यंत प्रभावी आहे. नियमित योगा केल्यानं शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढते. आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत तर योगाचं महत्त्व दिवसेंदिवस वाढतच आहे. तुम्ही शारीरिक आणि मानसिक त्रासांपासून दूर राहू इच्छित असाल तर, योगा हा अत्यंत सोपा आणि फायदेशीर उपाय. म्हणूनच जाणून घ्या नियमित योगा करण्याचे फायदे.

१) वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

सूर्य नमस्कार, कपालभाती आणि प्राणायाम या योगिक क्रियांनी वजन कमी होतं. रोज नियमित योगाचा सराव केल्यानं आणि योग्य आहार घेतल्यानं सुद्धा वजन नियंत्रणात राहायला मदत होते.

२) ताणतणावापासून मुक्ती 

योगासनं, प्राणायाम आणि ध्यान धारणा ही सर्व ताण तणाव नाहीशी करणारी प्रभावी तंत्रे आहेत. योगाच्या सरावानं शरीरातील विष द्रव्ये आणि ताण तणाव शरीराबाहेर टाकली जातात.

३) मनाला शांतता लाभते

सगळ्यांनाच एखाद्या शांत, प्रसन्न आणि निसर्गरम्य ठिकाणी जायला आवडते. मात्र, आपल्याला हवी असणारी शांती ही आपल्यामध्येच वसलेली आहे. या शांतीची अनुभूती घेण्यासाठी रोजच्या धकाधकीच्या कार्यक्रमातून थोडा वेळ काढून रोज योगा आणि ध्यान करण चांगलं. 

४) रोगप्रतिकारक शक्तीत वाढ

योगामुळे निरनिराळ्या अवयवांचे मर्दन केले जाते आणि त्यांचे स्नायू बळकट होतात. श्‍वसनाच्या वेगवेगळ्या तंत्रांमुळे आणि ध्यान धारणेमुळे शरीरात साठलेला ताण तणाव निघून जातो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

५) सजगतेत वाढ

मन हे सतत भूतकाळ आणि भविष्यकाळ यात झोके घेत असते. पण योग आणि प्राणायामांच्या मदतीनं आपल्यातली सजगता वाढते. सजगता वाढल्यानं इकडे तिकडे धावणाऱ्या मनाला आपण सतत वर्तमान क्षणात आणू शकतो. तसे केल्यानं मन आनंदी आणि एकाग्र बनते.

६) नाते संबंधात सुधारणा 

योग आणि ध्यान धारणेमुळे मन सतत आनंदी, प्रसन्न आणि शांत राहते. त्याचा उपयोग आपल्या जवळच्या लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी होतो.

७) ऊर्जा वाढते 

सतत दिवसभर काम करत राहिल्याने तुम्ही पार थकून जाता. परंतु रोज काही मिनिटे नियमित योगाचा सराव केल्याने तुम्ही दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही राहता. योगामुळे तुमच्यात उत्साह संचारेल आणि हातात घेतलेलं काम तुम्ही तत्परतेनं पूर्ण कराल. 

८) शरीराचा लवचिकपणा सुधारतो 

तुमच्या दैनंदिन कार्यक्रमात तुम्ही जर योगाचा समावेश केलात तर शरीर सशक्त, चपळ आणि लवचिक बनेल. रोज न चुकता योगा केलात तर तुमच्या शरीराच्या स्नायूंना बळकटी येईल. तुमच्या शरीराची ठेवण सुधारेल. उभे राहताना, बसताना, झोपताना आणि चालताना त्यात एक प्रकारचा डौल येईल. चुकीच्या पद्धतीने बसण्या उठण्यामुळे पूर्वी जे अंग दुखायचे तसे ते दुखणार नाही.

९) अंतर्ज्ञानात वाढ 

तुमच्या अंतर्ज्ञानात वाढ करण्याची क्षमता योग आणि ध्यानधारणेमध्ये आहे. तशी वाढ झाल्यामुळे कोणती गोष्ट कधी, कुठे आणि कशी करायला हवी याचे अचूक निर्णय तुम्ही घेऊन त्याचे फायदे मिळवू शकता. 

१०) रक्ताभिसरण सुधारते

योगामुळे शरीराच्या सर्व अवयवांना चांगला व्यायाम मिळतो. त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण वेगाणे होण्यास मदत होते. योगामुळे श्वासोच्छवास योग्य पद्धतीने घेतला जातो. त्यामुळे शरीरिरातील रक्ताभिसरण गतिमान होते.


पुढील बातमी
इतर बातम्या