सर्पदंश झाल्यावर त्यासाठी देण्यात येणाऱ्या लसीचा प्रभाव आता हळूहळू कमी होत असल्याचं काही घटनांमधून समोर आलं आहे. पूर्वी सर्पदंश झालेला व्यक्ती दोन किंवा तीन डोसनंतर (बाटल्या) ठणठणीत बरा व्हायचा. मात्र अाता त्यासाठी २५ ते ३० डोस घ्यावे लागतात. वेळेवर ड्रग्ज उपलब्ध न झाल्यास मृत्यू होण्याचं प्रमाण देखील वाढतं. सर्पदंशातून वाचलेल्या रुग्णांमध्ये अपंगत्व येण्याचं प्रमाण सध्या वाढलं अाहे.
मुंबईच्या परळ विभागात असलेल्या हाफकीन या रिसर्च सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, भारतात महाराष्ट्र राज्य हे सर्पदंशाच्या घटना आणि वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू होण्याच्या प्रमाणामुळे आघाडीवर आहे.
महाराष्ट्रात गेल्या वर्षी म्हणजेच एप्रिल ते डिसेंबर २൦१७ मध्ये ३३ हजार ६७३ केसेस आढळल्या आहेत. ज्यातून मृत्यू होण्याचं प्रमाणही जास्त आहे. भारतात दरवर्षी २ ते ३ लाख सर्पदंशांच्या केसेस आढळतात. त्यातून ५൦ हजार रुग्णांचा मृत्यू होतो. मुंबईत एप्रिल ते ऑक्टोबर २൦१७ मध्ये १३३ केसेस आढळल्या आहेत.
ठाण्यात १ हजार ३३२ सर्पदंशाच्या केसेस आढळल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, भारतात फक्त १൦ टक्केच सर्पदंशाच्या घटनांची नोंद केली जाते.
२൦१४ - २൦१५ - ३८ हजार ५१४
२൦१५ – २൦१६ - ३९ हजार १൦३
२൦१६ – २൦१७ - ३൦ हजार ६൦
एप्रिल ते सप्टेंबर २൦१७ मध्ये २६ हजार ८६१ केसेस महाराष्ट्रात आढळल्या होत्या.
बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीला साप चावला की त्या सापाने फक्त दंश केला आहे की त्याने शरीरात विष सोडलं, याचाही तपास केला जातो. अनेकदा ७൦ टक्के साप ड्राय बाईट करतो. म्हणजे तो शरीरात विष टाकतोच असं नाही. पण, ३൦ टक्के साप चावतो म्हणजे त्याचं विष शरीरात पसरतं. एखाद्या व्यक्तीला सापाचा दंश झाला आणि त्याने शरीरात विष सोडलं तर त्या व्यक्तीला तातडीने एएसवी म्हणजेच 'अँटी स्नेक वेनम' नावाची लस दिली जाते. ज्याला सर्पदंशावरील लस असंही म्हणतात. ज्याचा प्रभाव सध्या कमी होताना दिसत असल्याचं हाफकीन रिसर्च सेंटरच्या डायरेक्टर डॉ. निशिगंधा नाईक यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितलं आहे.
सर्पदंशामध्ये महाराष्ट्र संपूर्ण भारतात आघाडीवर आहे. आधी एखाद्या व्यक्तीला सर्पदंश झाला तर त्या व्यक्तीला २ ते ३ लस दिल्या जायच्या. पण, आता त्यांचं प्रमाण जवळपास २५ ते ३൦ एवढ्यावर जाऊन पोहोचलं आहे. त्यातून मृत्यूचं प्रमाण देखील वाढलं आहे. त्यामुळे आम्ही आणखी अँटी स्नेक लसींवर काम करत आहोत. अजून कशापद्धतीने लस तयार करता येईल यावर संशोधन सुरू अाहे.
- डॉ. निशिगंधा नाईक, डायरेक्टर, हाफकीन ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर
मुंबईतही साप आढळण्याचे प्रमाण वाढलं आहे. कारण, जिथे जास्त झाडी आहे, तिथे विषारी आणि बिनविषारी साप आढळू शकतात. मुंबईतही अशा बऱ्याच घटना घडतात, असंही डॉ. नाईक यांनी सांगितलं.