गणेशोत्सवानंतर मुंबईत येणाऱ्या नागरिकांच्या चाचणीस २६६ केंद्रे

मुंबईसह राज्यभरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला जात आहे. या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार व महापालिका प्रशासनानं विविध उपाययोजना राबवत आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठिकठिकाणी चाचणी केंद्र सुरू करण्यात आली. अशातच आता राज्यभरात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. या गणेशोत्सवानंतर कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळं पुढील १५ दिवस धोक्याचे असल्याने कोविड चाचणीचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. मुंबईबाहेरून येणाऱ्या नागरिकांना आरटीपीसीआर चाचणी करून घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

गणेशोस्तव काळात बाजारपेठेत खरेदीनिमित्त लोकांची वर्दळ वाढली होती. या काळात भेटीगाठी वाढतात. गणेशोत्सवासाठी आपल्या मूळ गावी विशेषतः कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या अधिक असते. मुंबईत परत येणाऱ्या प्रत्येकाची चाचणी होणे आवश्यक आहे. यासाठी महापालिकेनं मुंबईत २६६ चाचणी केंद्रं सुरू केली आहेत.

मुंबईत सध्या ४ हजार ६५८ सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण वाढीचा सरासरी दैनंदिन दर ०.०६ टक्के आहे. दररोज ४०० ते ४५० बाधित रुग्ण आढळून येत आहेत. तसंच रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही अत्यंत कमी आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात आला असल्यानं महापालिकेनं आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

गणेशोत्सवानंतर पुढील १५ दिवस महत्त्वाचे आहेत. त्यामुळे मुंबई बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची चाचणी होणे आवश्यक आहे. रेल्वेद्वारे येणाऱ्या प्रवाशांची चाचणी करणे शक्य होते. मात्र रस्ता मार्गे मुंबईत येणाऱ्या नागरिकांनी स्वतः येऊन पालिकेच्या २६६ केंद्रांवर विनामूल्य चाचणी करून घ्यावी.

पुढील बातमी
इतर बातम्या