एका २२ वर्षीय मुलाच्या अवयवदानामुळे चौघांना जीवदान मिळालं आहे. अपघात झाल्यानंतर त्याला तात्काळ मुंबईतील मिरारोडच्या वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, डॉक्टरांनी त्याला ब्रेनडेड घोषित केलं. दरम्यान मुलाच्या कुटुंबियांनी त्याचं अवयवदान करण्याचा निर्णय घेतला.
२७ एप्रिलला संदीप (बदललेलं नाव) नेहमीप्रमाणे बाईकवरून कॉलेजला निघाला होता. कॉलेजला जात असताना त्याचा अपघात झाला. अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला उपचारांसाठी जवळच्याच रुग्णालयात दाखल केलं. पण, त्यानंतर त्याला मिरारोडच्या वोक्हार्ट रुग्णालयात पुढील उपचारांसाठी हलवलं. पण, उपचारांना प्रतिसाद देत नसल्याने डॉक्टरांनी त्याला ३० एप्रिलला ब्रेनडेड घोषित केलं.
त्यानंतर वोक्हार्ट अवयवदान सन्मवयकांच्या टीमने संदीपच्या कुटुंबियांचं समुपदेशन करत अवयवदानासाठी परवानगी मिळवली. त्यानंतर तरुणाचं हृदय, दोन्ही मूत्रपिंड आणि यकृत खासगी रुग्णालयांतील गरजूंना दान करण्यात आलं.
कुटुंबीयांच्या परवानगीनंतर तरुणाचं हृदय मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयातील रुग्णाला दान करण्यात आलं. तर, विभागीय प्रत्यारोपण समन्वयक समितीच्या नियमावलीनुसार यकृत आणि एक मूत्रपिंड वोक्हार्ट रुग्णालयाला देण्यात आलं. शिवाय, दुसरं मूत्रपिंड जसलोक रुग्णालयातील रुग्णाला दान करण्यात आलं असल्याचं वोक्हार्ट रुग्णालयातील अवयव प्रत्यारोपण समन्वयक कुणाल बचाव यांनी सांगितलं.