'आम्ही काम करायचं तरी कसं?'

परळ - डॉक्टरांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी केईएम रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी निषेध रॅली काढली होती. या रॅलीत 400 हून अधिक डॉक्टर्स सहभागी झाले होते. गेल्या सात दिवसांत धुळे, नाशिक, औरंगाबाद, सायन रुग्णालय आणि वाडिया रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण झाल्याची घटना घडल्याने डॉक्टर आक्रमक झाले आहेत.

'एखादा रुग्ण रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्यावर प्राथमिक तापसण्या करून पुढील उपचार करण्यात येतात. मात्र रुग्णांचे नातेवाईक परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता डॉक्टर निष्काळजीपणा करीत असल्याची तक्रार करीत डॉक्टरांवर हल्ले घडवून आणतात. हे प्रकार केव्हा थांबणार?, आम्ही काम करायचे तरी कसे?' असा सवाल या डॉक्टरांनी उपस्थित केला आहे. या वाढत्या हल्ल्यांमुळे अशा वातावरणात काम करण्याऐवजी वैयक्तिक सुट्टी घेऊन शेकडो डॉक्टर सुट्टीवर गेले असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे निषेध रॅलीला मार्डच्यावतीने पाठिंबा देण्यात आलेला नाही.

दरम्यान, वाडिया रुग्णालयात डॉक्टरला मारहाण झाल्याची बातमी व्हायरल झाली होती. मात्र रुग्णालयात अशी कोणतीच घटना घडली नसल्याची माहिती वाडिया रुग्णालयाचे डॉक्टर मिनी बोधनवाला यांनी दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या