७० टक्के मुंबईकर व्यायामाबाबत आळशी, म्हणून बळावतोय हृदयविकार

सध्याच्या धावपळीच्या जीवनात व्यायाम करणं तर सोडा साधं एक वेळचं जेवायलाही वेळ मिळत नाही. त्याचा सर्वात जास्त परिणाम हा आपल्या शरीर आणि हृदयावर होत असतो. जीवघेण्या आजारांपासून वाचायचं असेल, तर दररोज किमान ३० मिनिटं ते १ तास व्यायाम करणं किंवा चालणं, धावणं गरजेचं आहे. पण ७० टक्के मुंबईकर व्यायामाला दांडी मारत असल्याने त्यांच्यामध्ये हृदयविकार बळावत असल्याचं वास्तव नुकत्याच एका सर्वेक्षणातून पुढं आलं आहे.

वोक्हार्ट हॉस्पिटलचं अनोख सर्वेक्षण 

घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईत दररोज ८० जणांचा मृत्यू हृदयविकाराने होत असल्याची धक्कादायक बाब २०१५ मध्ये उघडकीस आली होती. याच पार्श्वभूमीवर रोजचा व्यायाम करुन हृदयविकार कसे दूर ठेवता येतील? यासाठी मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटलने एक अनोखा उपक्रम राबवला.

मुंबईकरांना व्यायामाचं महत्त्व पटवून देण्यासाठी गेल्या महिनाभरापासून मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील कॉर्पोरट पार्क, मल्टिप्लेक्स, मॉल्स आणि कॉलेज याठिकाणी जिममध्ये असणारी एक सायकल ठेवण्यात आली आहे.

व्यायामाचं महत्त्व पटवून देणारी सायकल

ही सायकल चालवल्यानंतर तिथं उपस्थित असलेल्या हॉस्पिटलच्या प्रतिनिधींकडून बर्न झालेल्या कॅलरीजची नोंद करून घेतली जाते आणि आपल्या शरीरात अतिरिक्त कॅलरीजमुळे काय नुकसान होतं याचीही माहितीही दिली जाते.

मुंबईकरांना स्वत:च्या हृदयाची काळजी घेण्यासाठी व्यायामाचे महत्त्व सांगणे हा आमचा मुख्य उद्देश होता. आजार झाल्यावर त्यावर उपचार करणारी आधुनिक यंत्रणा आमच्याकडे उपलब्ध आहे. पण नागरिकांना होणारे आजार कसे टाळला येईल? याचं प्रबोधन अशा उपक्रमातून केलं जात आहे.

- डॉ. पराग रिंदानी, केंद्र प्रमुख, वोक्हार्ट हॉस्पिटल

टक्केवारी वाढण्याची गरज

या उपक्रमात आतापर्यंत ४ हजार मुंबईकरांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये ६० टक्के नागरिक हे चाळीशीतील आहेत. जिममध्ये जाण्याचा संकल्प करूनही ऑफिसचं काम अथवा काही कौटुंबिक जबाबदारीमुळे जिममध्ये न जाणारे मुंबईकर ३० टक्के असून रोज जिमला जायचं आहे, पण वेळ मिळत नाही असं सांगणारे ४० टक्के मुंबईकर या सर्वेक्षणातून समोर आले. 

तर रोजच्या व्यायामाचं महत्त्व जाणून केवळ २० टक्के मुंबईकर नियमित व्यायाम करत असल्याचंही यातून दिसून आलं. व्यायाम करणाऱ्या मुंबईकरांची टक्केवारी अत्यंत नगण्य असून त्यात मोठी वाढ होण्याची गरज असल्याचं मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

व्यायामाचा संकल्प करा, तरच...

शिवाय, वोक्हार्ट हॉस्पिटलच्या या उपक्रमात मुंबईकरांनी ४१ हजार कॅलरीज बर्न केल्या असून यातील बहुतेक नागरिकांनी आठवड्यातील निदान ३ दिवस व्यायाम करण्याचा संकल्प केला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या