चिंताजनक, राज्यात बुधवारी ९८५५ कोरोनाचे नवे रुग्ण

राज्यात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. बुधवारी राज्यात कोरोनाचे नवीन ९८५५ रुग्ण आढळले. मागील साडेचार महिन्यांतील ही सर्वोच्च रुग्णसंख्या आहे. तसंच ४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.४० टक्के एवढा आहे. 

बुधवारी ६५५९ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत २० लाख ४३ हजार ३४९  रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९३.७७ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ६५ लाख ९ हजार ५०६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१ लाख ७९ हजार १८५ (१३.२० टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख ६० हजार ५०० व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ३ हजार ७०१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. 

राज्यात सध्या ८२ हजार ३४३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सर्वाधिक १६ हजार ४९१ अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत.  नागपूर जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या दहा हजारांचा टप्पा ओलांडून १० हजार १३२ इतकी झाली आहे. त्यानंतर ठाणे जिल्ह्यात सध्या ८८१० रुग्ण उपचार घेत असून मुंबई पालिका हद्दीत ही संख्या ८५९४ इतकी आहे. 

केंद्र शासनाच्या आदेशानुसार देशात कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला १ मार्चपासून सुरूवात झालेली आहे. ६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण या टप्प्यात केले जात आहे. तसेच ४५ वर्षे पूर्ण ते ६० वर्षांपर्यंत वय असणाऱ्या व सह-व्याधी असणाऱ्या व्यक्तींचेही लसीकरण या तिसऱ्या टप्प्यामध्ये केले जात आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या