आंदोलन मागे घ्या अन्यथा कारवाई करू - महापौर

मुंबई - मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयात डॉक्टरला झालेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी प्रमुख रुग्णालयांच्या डॉक्टरांनी रविवार रात्रीपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे या डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने महापौरांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडल्या. परंतु महापौरांच्या आश्वासनांनी डॉक्टरांचे समाधान झाले नसून, महापौरांनी मात्र, आपण पोलिसांची कुमक आणि अलार्म प्रणाली बसवून डॉक्टरांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले. परंतु त्यानंतरही डॉक्टर आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. मात्र अशाप्रकारे आंदोलन सुरुच राहिल्यास डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिला आहे.

शीवमधील महापालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालयातील निवासी डॉक्टरला रविवारी रुग्णाच्या नातेवाईकांकडून धक्काबुक्की करण्यात आली. धुळ्यातील रुग्णालयातील डॉक्टरना झालेल्या मारहाणीनंतर मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरांनाही मारहाण झाल्यामुळे रविवार रात्रीपासून शीवसह केईएम आणि नायर रुग्णालयातील डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नायर रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची भेट घेतली. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त आय.ए.कुंदन, प्रमुख रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयांचे संचालक डॉ. अविनाश सुपे, यांच्यासह प्रमुख रुग्णालयांचे अधिष्ठाता, प्रमुख सुरक्षा अधिकारी दत्तात्रेय पाटील तसेच गटनेते उपस्थित होते. या बैठकीनंतर डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने कुठलाही तोडगा या बैठकीत निघाला नसल्याचे सांगितले. आजवर महापौर आणि प्रशासनाकडून लेखी तसेच तोंडी आश्वासने बरीच मिळाली. परंतु त्यांची अंमलबजावणी झालेली नाही. डॉक्टरांची सुरक्षा, अलार्म प्रणाली, पास पद्धत अशा सूचना केल्या असून याची त्वरीत अंमलबजावणी केली जावी, असे डॉ. शारोन सोनावणे यांनी सांगितले.

रुग्णालयात ७०० पोलिसांची सुरक्षा

डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रमुख मुद्दा विचारात घेऊन पोलीस संचालकांसोबत रुग्णालयांचे संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी चर्चा केली आहे. त्यानुसार शनिवारपर्यंत 400 पोलीस आणि एक एप्रिलपर्यंत आणखी त्यात 300 ने वाढ होऊन एकूण 700 पोलीस रुग्णालयातील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी तैनात केले जातील, अशी माहिती महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. याशिवाय, प्रत्येक रुग्णालयातील विभागांमध्ये अलार्म प्रणाली लावली जाईल. ज्यामुळे पोलिसांना त्वरीत घटनेची माहिती मिळेल. याबरोबरच रुग्णांच्या दोन नातेवाईकांनाच प्रवेश देण्यासाठी पास पद्धतीचा अवलंब केला जाईल, या बाबींची त्वरीत अंमलबजावणी केली जाईल, असेही महापौरांनी स्पष्ट केले. डॉक्टरांनी सामूहिक रजा घेत आंदोलन पुकारले आहे. परंतु हा एकप्रकारे संपच असून त्यांनी कामाला सुरुवात न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही महापौरांनी सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या