मुंबईत पुन्हा 'झिरो कोरोना' मिशन

मुंबईसह आसपासच्या परिसरात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. १ फेब्रुवारीपासून ही वाढ होत असून, ही वाढ पाहता महापालिकेनं कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईकर, आपण कोरोनाला हरविण्याच्या मार्गावर आहोत. आता मागे वळून बघायचे नाही. पुढेही मिशन झिरो पूर्ण करण्यासाठी सर्व नियमांचे पालन करूया, असं आवाहन मुंबई महापालिकेनं केलं होते.

मात्र, मागील १५ एक दिवसांत पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानं महापालिकेचे देखील धाबे दणाणले आहेत. मुंबईकर, आम्ही आपल्यावर नजर ठेवून आहोत आणि कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवून मिशन झिरो साध्य करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कृपया मास्कचा वापर करा, असे आवाहन मुंबई महापालिकेनं नागरिकांना पुन्हा एकदा केलं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाद्वारे देण्यात आलेल्या निर्देशांनुसार सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी वावरताना प्रत्येकाने आपल्या चेहऱ्यावर मास्क लावणं अनिवार्य करण्यात आले आहे. मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांवर २०० रुपये एवढी दंड आकारणी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. यानुसार मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई ९ एप्रिल २०२० पासून नियमितपणे करण्यात येत आहे.

त्यानुसार रेस्टॉरंट, क्लब, जिमखाना, चित्रपटगृह इत्यादींमध्ये देखील धडक कारवाई करण्यात येऊन कोविड विषयक प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. जून-जुलै २०२० मधील स्थितीच्‍या तुलनेत आजही कोविड संसर्गाची स्थिती नियंत्रणात आहे.

महापालिकेचं मिशन

  • ज्या व्यक्तिंना कोविड संबंधी लक्षणं आहेत, त्यांनी आपली वैद्यकीय चाचणी निर्धारित केलेल्या ठिकाणी किंवा खासगी वैद्यकीय प्रयोग शाळांकडून आवर्जून करावी. 
  • सर्व वैद्यकीय प्रयोगशाळांना यापूर्वीच दिलेल्या सुचनांनुसार कोविड बाधितांच्या चाचणीचे अहवाल हे प्रथम पालिकेला कळविणे बंधनकारक आहे.
  • खाटांची संभाव्य गरज लक्षात घेऊन २४ विभागांच्या सहाय्यक आयुक्तांनी कार्यक्षेत्राच्या दृष्टीने आवश्यक नियोजन करावं.
  • रुग्णांच्या हातावर विलगीकरणाचे ठसे उमटविणं बंधनकारक आहे.
  • गृह विलगीकरणात असलेले, लक्षणे नसलेले रुग्ण हे घरातच असल्याची खातरजमा करण्यासाठी वॉर्ड वॉर रुमद्वारे दररोज ४ वेळा दूरध्वनी करावेत.
  • रुग्णांना रुग्णालयात दाखल करावयाची कार्यवाही वॉर्ड वॉर रुमद्वारेच करणे आवश्यक आहे.
  • ज्या इमारतींत ५ पेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून येतील, अशा इमारती सील कराव्यात.
  • रेल्‍वे प्रवासात मास्‍क न घालणाऱ्यांवर कारवाईसाठी ३०० मार्शल.
  • विना मास्‍क फिरणाऱ्यांवर कारवाईसाठी मार्शल्‍सची संख्‍या दुप्‍पट, दररोज २५ हजार जणांवर कारवाई
  • खेळाच्‍या मैदानांवर व उद्यानांमध्‍ये देखील मास्‍क न घालणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
पुढील बातमी
इतर बातम्या