बी निगेटिव्हवाल्यांनो..... रहा पॉझिटिव्ह !

आपल्याला कोणत्याही गोष्टीचं दडपण आलं तर सर्वात प्रथम आपण स्वतःलाच "बी पॉझिटिव्ह" असं म्हणत प्रोत्साहित करतो. काही जण तर "अरे माझ्या रक्तातच 'बी पॉझिटिव्ह' आहे, मग मी पॉझिटिव्ह असणारच! ज्यांचा रक्तगट "ओ" आहे ते लोक आपण "युनिव्हर्सल डोनर" आहोत याचा आनंद व्यक्त करतात, पण ओ व्यतिरिक्त बाकी रक्तगट आहेत त्या रक्तगटाबद्दल आपल्याला पुरेशी माहिती नाही. त्यातच बी निगेटिव्ह या रक्तगटाबद्दल काहीसं वेगळंच मत मांडलं जात. जुलै म्हणजे "बी निगेटिव्ह महिना"च्या खास प्रसंगी सेंट जॉर्जेसचे अधिष्ठाता डॉ. मधुकर गायकवाड यांनी "बी निगेटिव्ह" या रक्तगटाबद्दल पुढील माहिती दिली आहे

रक्तगटांची ओळख

मानवी शरीरातील तांबड्या पेशींवरील असलेल्या प्रथिनांमुळे रक्तगटांची ओळख होते. "ए, बी, एबी आणि ओ" ए म्हणजे प्रोटीन असलेलं "बी" दोन्ही प्रोटीन असलेलं "एबी" आणि "ओ" एकही प्रोटीन नसलेला रक्तगट अशा प्रकारे चार गटात रक्तगट विभागले जातात. रक्ताच्या "आरएच"(‘अँटिजीन रायसस’) वरून आपल्याला तो रक्तगट पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह आहे हे समजतं. रक्तगट हा अनुवांशिक असल्याकारणानं माता पिता यांच्या रक्तगटावरून बाळाचं रक्तगट बनतं; उदाहरणार्थ जर माता ए आणि पिता बी रक्तगटाचे असतील तर त्यांच्यापासून होणाऱ्या अपत्याचं रक्तगट हे ए, बी, आणि एबी यांच्यापैकी एक असू शकतो. बोन मॅरो प्रत्यारोपणादरम्यान व्यक्तीचा रक्तगट बदलण्याची शक्यता असते.

दुर्मिळ रक्तगट

मानवी शरीरामध्ये "ओ निगेटिव्ह" आणि "बी निगेटिव्ह" हे रक्तगट दुर्मिळ आहेत. "ओ" रक्तगट असलेला व्यक्ती हा "युनिव्हर्सल डोनर" असतो. पण त्याला फक्त "ओ" रक्तगट असलेला व्यक्तीच रक्त देऊ शकतो, "बी निगेटिव्ह" हा रक्तगट देखील दुर्मिळ रक्तगट मानला जातो, कारण "बी निगेटिव्ह" असलेल्या व्यक्तीलाच तो रक्त देऊ शकतो बाकी कोणत्याही रक्तगटास तो रक्त देऊ शकत नाही. "ओ निगेटिव्ह" रक्तगट असलेला व्यक्ती "बी निगेटिव्ह असलेल्या व्यक्तीस रक्त दान करू शकतो.

गर्भधारणा आणि रक्तगट

एखाद्या विवाहित जोडप्यांची जर अपत्यासाठी विचार करत असाल तर त्यांनी सर्वात प्रथम रक्तगट ओळखीची चाचणी करावी, जेणेकरून भविष्यात होणाऱ्या अपत्याचा रक्तगटाच्या आपण अंदाज बांधू शकतो. जर एखाद्या महिलेचा "बी निगेटिव्ह" आणि पुरुषाचा रक्तगट "ओ पॉझिटिव्ह" असेल तर त्यांच्यापासून होणाऱ्या अपत्याची विशेष काळजी घ्यावी लागते, कारण भविष्यात त्या बाळाला कावीळ होण्याची शक्यता जास्त असते. "बी निगेटिव्ह" रक्तगट असलेल्या महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने गर्भधारणेचा निर्णय घ्यावा.

रक्तगटावरून लोकांचे गैरसमज

"बी निगेटिव्ह" असलेल्या मुलीशी लग्न करू नका.... असं काहीदा म्हटलं जात, किंवा "बी निगेटिव्ह" वाले प्रचंड निगेटिव्ह वृत्तीचे असतात, असा लोकांचा समाज असतो. पण वास्तवात असं काहीही नाही. लग्नापूर्वी रक्तगट, एचआयव्ही, टी.बी आणि कर्करोगाच्या चाचण्या करण्याचे सल्ले आम्ही लोकांना देतो. परंतु, "बी निगेटिव्ह" असलेल्या महिलेमध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी नसतात; त्यामुळे अशा प्रकारची विचारधारणा चुकीची आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान असल्याकारणाने आपण सर्वांनी रक्तदान करणं गरजेचं आहे. दुर्मिळ रक्तगट असलेल्या लोकांनी रक्तदान आवर्जून करावं आणि निगेटिव्ह रक्तगट असलेल्या लोकांबद्दल चुकीचे समज पसरवण्यापेक्षा ते देखील इतर लोकांप्रमाणे सामान्यच आहे, याची जाणीव असावी.

पुढील बातमी
इतर बातम्या