मध्य व पश्चिम रेल्वेच्या १३० रेल्वे कर्मचाऱ्यांकडून प्लाझ्मा दान

मुंबईसह राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मार्च महिन्यात राज्यात दाखल झालेल्या या कोरोनावर अद्याप औषध नसल्यानं सामाजिक अंतराच्या नियमांच पालन व मास्क घालण्याचं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे. शिवाय, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार होण्यासाठी प्लाझ्मा (रक्तद्रव) दान करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा एकमेव सुरक्षित उपाय असल्यानं ठिकठिकाणी जनजागृती करून नागरिकांना प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे. अशातच आता यामध्ये मध्य व पश्चिम रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनीही पुढाकार घेतला आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी प्लाझ्मा दानाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या मुंबईतील जगजीवनराम रुग्णालयात मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या १३० कर्मचाऱ्यांनी प्लाझ्मा दान केलं असून, यात आरपीएफ (रेल्वे सुरक्षा दल) कर्मचारी आघाडीवर आहेत. लॉकडाऊनमध्ये ही रेल्वेचे कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहेत.

रेल्वे सुरक्षा दल, मोटरमन, लोको पायलट, कारशेडमधील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यही कोरोनाबाधित झाले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत आपलं रक्तद्रव दान करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनातून बरे झालेल्यांचं रक्तद्रव घेऊन त्याद्वारे कोरोनाबाधितांवर उपचार केले जातात.

त्यानुसार, रेल्वेच्या जगजीवनराम रुग्णालयात आतापर्यंत १३० कर्मचाऱ्यांनी रक्तद्रव दान केलं आहेत. तर त्याचा फायदा २६० जणांना झाल्याची माहिती देण्यात आली. रक्तद्रव दान केलेल्यांमध्ये ५० टक्के पेक्षा जास्त रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी आहेत. ऑगस्ट महिन्यात ३३ कर्मचाऱ्यांनी रक्तद्रव दान केले होते. त्यांची संख्या काही प्रमाणात वाढली आहे. यामध्ये महिलांनीही पुढाकार घेतला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या