१०० टक्के लसीकरण २६ जानेवारीपर्यंत पुर्ण करण्याचे महापालिकेचे लक्ष्य

नव वर्षात १०० टक्के लसीकरण पुर्ण करण्याचं लक्ष्य महापालिकेनं ठेवलं आहे. त्यानुसार नव वर्षातील २६ जानेवारीपर्यंत १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महापालिका प्रशासनानं ठेवलं आहे. सध्यस्थितीत १४ लाख नागरिकांची दुसरी मात्रा २६ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट महापालिकेनं ठेवलं आहे.

जनगणनेच्या सांख्यिकी आधारे आणि पात्र नागरिकांची संख्या लक्षात घेता, शासनानं सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना आपापल्या क्षेत्रात लसीकरणाचं उद्दिष्ट निश्चित करून दिले आहे. त्यानुसार मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुमारे ९२ लाख ३६ हजार ५०० पात्र नागरिकांचे कोविड लसीकरण करावयाचे आहे.

मुंबई महानगरपालिकेनं ९२ लाख नागरिकांना पहिली मात्रा देण्याचे उद्दिष्ट नोव्हेंबर महिन्यातच पूर्ण केलं होतं. मात्र, दुसऱ्या मात्रेबाबत अद्याप हे लक्ष्य पूर्ण झालेलं नाही. जगभरात कोरोना विषाणूचा नवीन प्रकार असलेल्या ऑमिक्रॉनच्या संसर्गाचा धोका असल्यामुळं महापालिकेनं लसीकरणावर भर दिला आहे.

मुंबईत होणाऱ्या लसीकरणात मुंबईबाहेरील नागरिकांचादेखील समावेश आहे. त्यामुळे पहिल्या मात्रेचे ९२ लाखांचे लक्ष्य पूर्ण केल्यानंतरही अद्यापही पहिली मात्रा घेणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रात पहिल्या मात्रेचे १०० टक्क्यांहून अधिक लसीकरण झाले आहे.

मुंबईत आतापर्यंत ९९ लाखांहून अधिक नागरिकांनी पहिली मात्रा घेतली आहे. मात्र दुसऱ्या मात्रेसाठी अद्याप हे लक्ष्य गाठता आलेले नाही. शनिवापर्यंत पहिली मात्रा घेणाऱ्यांची मुंबईतील संख्या ९९ लाख ६०२ इतकी झाली आहे. त्यामुळं येत्या एक-दोन दिवसांत पहिली मात्रा घेणाऱ्यांची संख्या एक कोटी होण्याची शक्यता आहे.

मुंबईत सध्या दररोज साधारण ४५ हजार नागरिकांचे लसीकरण होते आहे. आतापर्यंत १ कोटी ७७ लाख २० हजार ५८५ नागरिकांनी लस घेतली आहे. त्यापैकी ७८ लाख लोकांनी दोन्ही मात्रा घेतल्या आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या