महापालिकेच्या १२७ दवाखान्यांत येणार आहारतज्ज्ञ

सध्याची धकाधकीची जीवनशैली आणि खानपानाच्या वाईट सवयींमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन हृदयविकारासारख्या गंभीर आजारांचं प्रमाण वाढत आहे. हा धोका टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने महापालिकेच्या दवाखान्यात आहारतज्ज्ञाची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवेचा लाभ गरीब आणि गरजू रुग्णांना घेता येणार आहे.

सुविधा १५ दिवसांत सुरू

महापालिका शहरभरातील १२७ दवाखान्यांत आहारतज्ज्ञाची नेमणूक करणार आहे. 'आपली चिकित्सा' योजनेअंतर्गत ही सुविधा सुरू करण्यात येईल. यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या १५ दिवसांत ही सुविधा सुरू करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिली. हे आहारतज्ज्ञ मधुमेह, हायपरटेन्शन आणि कोलेस्ट्रोल यावर कसं नियंत्रण ठेवावं, याबद्दल गरजू आणि गरीब रुग्णांना मार्गदर्शन करतील, असंही ते म्हणाले.

कंत्राटी पद्धतीने नेमणूक

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार अल्प उत्पन्न गटामध्ये जीवनशैलीचे आजार आढळू लागले आहेत. महापालिकेने त्याची दखल घेत आपल्या १२७ दवाखान्यांमध्ये कंत्राटी पद्धतीने आहारतज्ज्ञांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये विविध प्रकारच्या रक्त चाचण्या होत नाहीत. शिवाय वैद्यकीय निदानासाठी लागणाऱ्या प्राथमिक चाचण्याही होत नाहीत. आता या दवाखान्यांत खासगी संस्थांच्या मदतीने सर्व प्रकारच्या प्राथमिक चाचण्यांची सोय रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

जीवनशैलीचे आजार फक्त उच्चभ्रू लोकांना जडतात, हा समज चुकीचा आहे. आता महापालिकेच्या दवाखान्यांत प्राथमिक उपचारांसाठी येणाऱ्या अल्प गटातील रुग्णांमध्येही असे आजार आढळू लागले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये आहारतज्ज्ञांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

- डॉ. पद्मजा केसकर,  कार्यकारी आरोग्य अधिकारी, महापालिका सार्वजनिक आरोग्य विभाग

पुढील बातमी
इतर बातम्या