महालक्ष्मी रेसकोर्सवर पालिका पुन्हा उभारणार जम्बो कोविड सेंटर

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महालक्ष्मी रेसकोर्स येथे पुन्हा जम्बो कोविड सेंटर सुरु करण्याचा निर्णय मुंबई पालिकेने घेतला आहे. या ठिकाणी एकूण  ४५० बेड्स असणार आहेत. यासाठी पालिकेकडून ४४ कोटी ८३ लाख ३८ हजार रुपये खर्च केला जाणार आहे.

या कोविड सेंटरमध्ये २०५ आयसीयू बेड्स  व गंभीर असलेल्या कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी २५० असे ४५० बेड्स तैनात ठेवले जाणार आहेत. फेब्रुवारीच्या मध्यावर कोरोनाची दुस-या लाटेला मुंबईकरांना सामोरे जावे लागले. त्यामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले. सर्वेक्षण, वाढवण्यात आलेल्य़ा चाचण्या, रुग्णांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांचा युद्धपातळीवर शोध, क्वारंटाईन, प्रतिबंधित क्षेत्राची कडक अंमलबजावणी, योग्य उपचार पद्धती व पालिकेच्या प्रभावी उपाययोजनांमुळे दुस-या लाटेवरही नियंत्रण आले आहे.

सप्टेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा इशारा आरोग्य तंज्ञांनी दिला आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेत कोरोना बाधित रुग्णांवर वेळीच उपचार करणे शक्य व्हावे यासाठी महालक्ष्मी रेसकोर्सच्या पार्किंग क्षेत्रात ४५५ खाटांचा कोरोना केंद्र उभारण्यात येणार आहे. महालक्ष्मी जम्बो कोविड सेंटर मध्ये ऑक्सिजन पुरवठा, अग्नीसूचक यंत्रणा अशा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच या सगळ्या कामासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार असून सल्लागाराला १३ लाख रुपये मोजण्यात येणार आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या