लहान मुलांनाही ऑक्टोबरपासून मिळणार कोरोना लस

मुलांनाही आता ऑक्टोबरपासून मिळणार कोरोना प्रतिबंधक लस मिळणार आहे. जगातील पहिली डीनए झायकोव-डी लसीला भारतात परवानगी मिळाली आहे. त्यामुळे देशातील १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना लस मिळणार आहे. 

देशात १२ वर्षावरील वयोगटातील मुलांची संख्या १२ कोटींपर्यंत आहे. ही लस सर्वप्रथम गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या मुलांना दिली जाणार आहे. DCGI कडून यासाठीची परवानगी मिळली असून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून मुलांना झायडस कॅडिला ही लस देण्यात येणार आहे.

सरकारच्या कोविड वर्किंग ग्रुप कमिटीचे प्रमुख डॉ. एनके अरोरा यांनी सांगितलं की, सर्वप्रथम १२ ते १७ वयोगटातील गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या मुलांना लस दिली जाईल. येत्या काळात आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाची बैठकीत गंभीर आजारांच्या श्रेणीमध्ये कोणत्या रोगांचा समावेश करण्याबाबत निर्णय घेऊन यादी जाहीर केली जाईल. तर याच वयोगटातील निरोगी मुलांना मार्च २०२२ पर्यंत लसीकरणासाठी थांबावं लागणार आहे.

निरोगी मुलांमध्ये गंभीर आजार किंवा मृत्यूची शक्यता नगण्य आहे. १८-४५ वयोगटातील लोकांना गंभीर आजार होण्याची शक्यता १० ते १५ टक्के जास्त असते. गंभीर आजार असलेल्या मुलांची चिंता आहे म्हणून त्यांना लसीकरणात प्राधान्य देण्यात येणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या