रुग्णांच्या हातातील फाईल जाणार, एका क्लिकवर मिळणार माहिती

  • मुंबई लाइव्ह टीम & सूरज सावंत
  • आरोग्य

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची इत्यंभूत माहिती आता संगणकावर उपलब्ध होणार आहे. मागील दहा वर्षांपासून महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णालय व्यवस्थापन प्रणाली लागू करण्याच्या केवळ घोषणाच होत आहे. आजवर तांत्रिक कारणांमुळे रखडलेल्या या संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. मुंबई महापालिकेच्या एक प्रमुख रुग्णालय, एक विशेष आणि ३ उपनगरीय रुग्णालय अशाप्रकारे ५ रुग्णालयांमध्ये प्राथमिक स्वरुपात या प्रणालीचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे आता रुग्णांची सर्व माहिती एका क्लिकवर मिळणार असून भविष्यात रुग्णांना फाईल अणि रिपोर्ट घेऊन रुग्णालयांमध्ये फिरायची गरज भासणार नाही.

यासाठी ५८ कोटींचा खर्च

मुंबई महापालिकेच्या आरोग्य सेवांची गुणवत्ता आणि प्रतिसाद सुधारण्यासाठी प्रमुख रुग्णालयांसह विशेष रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये, प्रसुतीगृह, दवाखाने आणि आरोग्य केंद्र याठिकाणी रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणाली राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. सन २००५ पासून अशाप्रकारची व्यवस्थापन माहिती प्रणालीचा अवलंब केला जात असल्याची घोषणा अर्थसंकल्पात प्रशासनाने केली होती. परंतु, आतापर्यंत ही योजना कागदावरच होती. प्रशासन ही योजना राबवण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलत नसल्यामुळे आणि यासाठी माहिती आणि तंत्रज्ञान संबंधित कंपनी पुढे येत नसल्यामुळे याला मुहूर्त सापडत नव्हता.

मात्र, आता नायरसह कस्तुरबा, राजावाडी, कूपर आणि कांदिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयांमध्ये या माहिती प्रणालीचा अवलंब केला जात आहे. यासाठी कंपनी निवड केली असून याकरता सुमारे ५८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणालीसाठी टप्प्याटप्प्याने ३ महिन्यांच्या कालावधीत संगणक, नेटवर्क उपकरणे, इंटरनेट लाईन आणि मनुष्यबळ पुरवठा आदींची अंमलबजावणी प्रथम या पाच रुग्णालयांमध्ये केली जाणार आहे. त्यानंतर देखभाल कालावधी असेल, असे माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

या पाच रुग्णालयांमध्ये याचा वापर

यामध्ये प्रथम केईएम रुग्णालयाचा समावेश होता. परंतु, आता केईएम ऐवजी नायर रुग्णालयाचा समावेश करण्यात आला आहे. केईएम रुग्णालय मोठे असल्यामुळे त्याऐवजी नायरला करावे, असं या तज्ज्ञांचं मत बनलं आहे. त्यानुसार हा बदल करण्यात आला असल्याचे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी मुंबई लाईव्हशी बोलतांना सांगितलं. यासाठीचे सॉफ्टवेअर प्रणाली विकसित झालेली आहे. त्यामुळे यासाठी लागणारी हार्डवेअर प्रणालीचा वापर करून प्राथमिक स्वरुपात पाच रुग्णालयांमध्ये याचा वापर केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

या प्रणालीचा अवलंब झाल्यास या रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या सर्व रुग्णांची माहिती संगणकावर अपलोड केली जाणार आहे. यामध्ये रुग्णांची सर्व वैयक्तिक माहितीसह त्याला असलेला आजार तसेच यापूर्वी आजारांवर केलेले उपचार आदींची माहिती या प्रणालीद्वारे एका क्लिकवर मिळणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या