नवी मुंबईत झोपडपट्टीतील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात

नवी मुंबईत झोपडपट्टीतील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याचं दिसून आलं आहे. त्या तुलनेत इमारतींमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. झोपडपट्टीत रुग्ण सापडण्याचं प्रमाण खूपच कमी आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेतही नवी मुंबईत झोपडपट्टीमध्ये कोरोनावर नियंत्रण आणण्यात यश आलं आहे. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही झोपडपट्टीत कोरोनाचा फैलाव रोखला गेला आहे.  कोरोनाच्या पहिल्या लाटेत झोपडपट्टी परिसर असलेल्या तुर्भे पॅटर्नची चर्चा होती. आताही तुर्भे व अन्य झोपडपट्टी भागात कोरोनाची परिस्थिती अत्यंत नियंत्रणात आहे. इंदिरानगर परिसरातील फक्त  दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  तर इमारती, गृह संकुलांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठी आहे. 

नवी मुंबईत आठ विभाग कार्यालये आहेत. त्यामध्ये तुर्भे विभाग कार्यालय क्षेत्रात येणाऱ्या तुर्भे परिसरात सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. तुर्भे विभागात पालिकेची चार नागरी आरोग्य केंद्रे आहेत. त्यामध्ये तुर्भे स्टोअर, इंदिरानगर, पावणे तसंच सानपाडा या परिसरात शहरातील मोठी लोकसंख्या झोपडपट्टीमध्ये राहते.  हा परिसर अतिशय दाटीवाटीचा आहे. 

धारावीप्रमाणे या परिसरातही पहिल्या लाटेत मोठी रुग्णवाढ झाली होती. मात्र, तुर्भे झोपडपट्टी परिसरात पालिका अधिकारी, आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका, स्थानिक सामाजिक संस्था व विविध समाजसेवकांच्या मदतीने कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्यात यश आलं होतं. 

दुसऱ्या लाटेत नवी मुंबईत सर्वच ठिकाणी रुग्णसंख्या वेगाने वाढली. मात्र, झोपडपट्टी परिसरात कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. तुर्भे स्टोअर व इंदिरानगर परिसरात रुग्ण संख्या कमी झाली आहे. येथे एक अंकी उपचाराधीन रुग्ण सापडत आहेत. तर शहरी भागात मात्र अद्यापही करोना उपचाराधीन रुग्ण जास्त आहेत. 


हेही वाचा -

  1. बापरे! मुंबईतील 'या' भागात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या
  2. परराज्यातील मालवाहतूक वाहन चालकांना कोरोना चाचणी बंधनकारक
पुढील बातमी
इतर बातम्या